बापूजींच्या गोड गोष्टी 26
२७
जगातील सारे थोर पुरुष साधेपणाने राहणारे होते; त्यांना कोणतेही काम करताना कंटाळा वाटत नसे. भगवान गोपालकृष्ण गाई चारी, घोडे हाकी, उष्टी काढी. महंमद पैगंबर उंट चारीत, स्वत:चे कपडे शिवीत, गोठ्यात जाऊन दूध काढीत, मशीद झाडीत. परंतु महात्मे सेवेचे कोणतेही काम कमी मानत नसत. एवढेच नव्हे तर ते खेळही खेळत. गोपाळकृष्ण गोपाळांबरोबर खेळे. कृष्ण भगवानाने खेळांना दिव्यता दिली आहे. त्यांचा पेंद्या अमर आहे. महंमद पैगंबरही मुलांत रमायचे, खेळायचे, गोष्टी करायचे. येशू ख्रिस्तही मुलांवर प्रेम करी.
महात्माजींचेही मुलांवर प्रेम. अपार प्रेम. दक्षिण आफ्रिकेत त्या वेळेस महात्माजी राहत होते. साधी राहणी होती. सारे स्वावलंबन. सकाळी सहा वाजताच उठून दळायला लागत. दिवसा लागणारे पीठ घरातील पुरुष मंडळी दळून देत. दहा-पंधरा मिनिटे दळण्याचे काम चाले. पुरेसे मिळे. दळताना गाणी, विनोद, हसणे चाले. दळताना व्यायामही होई आणि आनंदही मिळे. जात्याच्या आवाजात हसण्याचा आवाज मिसळे. गंमत असे. पाणी भरणे, केर काढणे, संडास साफ करणे, भांडी घासणे, सारे काम घरीच असे. शरीराला व्यायाम होई, काम स्वच्छ होई.
परंतु मला एक गंमत सांगायची आहे. महात्माजी फिरण्याचा रोज व्यायाम घेत हे सर्वांना माहीत आहे. मी सांगणार आहे ती गोष्ट आहे तुम्हांला माहीत? महात्माजी दळू लागत, संडास साफ करीत. परंतु ते निऱाळा एक गंमतीदार व्यायाम घेत. ओळखा. जोर काढीत? नाही. बैठका काढीत? नाही. आसने करीत? नाही. तर मग कोणता व्यायाम ते घेत? ओळखलात? महात्माजी दोरीवरच्या उड्या मारण्यात मोठे तरबेज होते. महात्माजी सकाळी दोरी हातात घेऊन उड्या मारीत. हसणे फारसे ऐकू येत नसे. परंतु दळताना, दोरी हातात घोऊन उड्या मारताना हशा पिके. मौज- गंमत वाटे. जगाला अहिंसेचा संदेश देणारा महात्मा, भारताला स्वातंत्र्य देणारा महात्मा- तो राष्ट्रपिता दक्षिण आफ्रिकेत सकाळी दोरी घेऊन उड्या मारी! चित्रकाराने महात्माजींचे हे चित्र काढावे. गंमत वाटेल नाही? गोपाळकृष्ण गोकुळात चेंडू लगो-या खेळले. महात्माजी दोरीवरच्या उड्या मारीत.