बापूजींच्या गोड गोष्टी 73
७५
लोकमान्य टिळकांबद्दल महात्माजींना अपार आदर. परंतु त्यांनाही नम्रपणे परंतु निर्भयपणे सांगायला महात्माजी कचरत नसत. १९१७ मधील गोष्ट. कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. डॉ. अॅनी बेझंटबाई अध्यक्ष होत्या. अधिवेशनाच्या निमित्ताने इतरही जाहीर सभा होत. पुढा-यांची भाषणे होत.
ती पहा एक प्रचंड सभा भरली आहे. हजारो लोक जमले आहेत. लोकमान्य टिळक, गांधीजी अशी थोर मंडळी तेथे आहेत. लोकमान्यांचे भाषण झाले, ते इंग्रजीत बोलले. नंतर गांधीजी उठून म्हणाले, ‘लोकमान्यांचं सुंदर, स्फूर्तिदायक भाषण हिंदीमधून झालं असतं तर बहुतेकांना समजलं असतं. हे इंग्रजी भाषण फारच थोड्या लोकांना कळलं असेल. भाषण ज्यांना कळलं नाही त्यांनी हात वर करा बघू.’ हजारो हात वर झाले. गांधीजी लोकमान्यांना म्हणाले, ‘या जनतेला कळेल असं नको का व्हायला?’
आणि लोकमान्य पुन्हा उभे राहिले. जनता हेच त्यांचेही दैवत होते. लोकमान्यांनी हिंदीचा अभ्यास केलेला नव्हता. तरीही मोडक्यातोडक्या हिंदीत ते बोलले. खरी राष्ट्रीयता, खरे राष्ट्रैक्य तेथे जन्मत होते.