बापूजींच्या गोड गोष्टी 54
५६
काँग्रेसच्या कार्यकारिणीची एकदा बैठक चालली होती. बराच वेळ बैठक चालली. लोक जरा चुळबुळ करू लागले होते. गांधीजींच्या लक्षात एकदम ती गोष्ट आली. ते म्हणाले, :
‘आता चहा पिऊन या सारे. तुमची सर्वांची वेळ झाली असेल.’
‘तशी जरूर नाही. आणखी काही वेळ बसू. मग पिऊ चहा.’
‘वेळेवर सारं झालं पाहिजे. मागून काय उपयोग? तुम्ही तर बेचैन दिसत आहात. जा, या पिऊन; चहाचा का आग्रह हवा तुम्हांला?’ गांधीजी हसून म्हणाले आणि सारे हसले. राष्ट्राचा पिता सर्वांची काळजी घेणारा. महादेवभाईंना एकदा रात्री खूप काम पडले, तर बापूंनी त्यांच्यासाठी चहा करून ठेवला! सरदार चहा घेणारे. परंतु ३२ साली येरवड्यास गांधीजींबरोबर असताना, बापू चहा घेत नसत म्हणून सरदारही घेत नसत. थोरांच्या थोर गोष्टी.