बापूजींच्या गोड गोष्टी 64
६६
गांधीजी त्या वेळेस येरवड्यास होते. कोणा तरी परकीयाने त्या वेळेस गांधीजींना पत्र लिहिले होते. तो परकी मनुष्य वयाने लहान होता की मोठा? परंतु बहुधा तो बालक असावा. एरव्ही असा निर्मळपणा कोठे आढळेल?
त्या पत्रात काय होते, ते कोण सांगेल? ते पत्र आज उपलब्ध आहे की नाही, माहीत नाही. परंतु दिल्लीच्या राजघाट येथील प्रदर्शनात त्या पत्राच्या वरचा लिफाफा ठेवलेला होता. त्या लिफाफ्यावरचा पत्ता वाचा नि सदगदित व्हा.
TO
THE KING OF INDIA,
DELHI, INDIA
(अर्थ : हिंदुस्थानच्या राजाला; दिल्ली, हिंदुस्थान.)
असा पत्ता पत्रावर होता. आतील मजकुरावरून ते पत्र गांधीजींना उद्देशून लिहिलेले होते असे दिसते. म्हणून ते पत्र अखेर येरवड्यास आले. हिंदुस्थानचा राजा ब्रिटिशांच्या तुरुंगात होता. हिंदी जनतेचा खरा राजा इंग्लंडात नव्हता. पत्र पाठवणा-या त्या अज्ञात व्यक्तीला भारताचा राजा म्हणजे महात्माजी असे वाटले! किती सत्यमय गोष्ट! इतर राजे येतील-जातील, परंतु या राजाचे सिंहासन भारतीयांच्याच नव्हे तर जगातील सर्व लोकांच्या हृदयात चिरंतन राहील. कारण सत्य आणि प्रेम यांवर ते सिंहासन उभारलेले आहे.