बापूजींच्या गोड गोष्टी 91
९३
गांधीजी नेहमी म्हणायचे : ‘मी सर्वांहून अधिक लोकशाहीचा भोक्ता आहे.’ खरोखर तसे ते होते. कधी कोणावर काही लादीत नसत. साबरमतीच्या आश्रमात लहान मुलांजवळ वागतानासुद्धा त्यांची ही वृत्ती दिसून येई. त्या वेळेस काकासाहेबांचा मुलगा बाळ आश्रमातच होता. बाळ व त्याचे मित्र यांना साबण हवा होता. कपडे मळले होते.
‘गांधीजींची मंजुरी आणा. मग साबणाला पैसे मिळतील.’ चालक म्हणाले.
ते बालवीर बापूंकडे गेले.
‘बापू, तुम्ही मंजुरी द्या.’
‘परंतु आपणाला गरिबीनं राहायचं. शेतकरी जीवन जगायचं. शेतकरी का रोज कपड्याला साबण लावतो? ते बरं नाही दिसणार.’ गांधीजी म्हणाले.
‘शेतक-यानं का गलिच्छ राहावं? त्यालाही साबण मिळेल असं स्वराज्यात करू. कामावरून घरी आल्यावर त्यानंही स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. स्वच्छता म्हणजे का बापू, छानछोकी? स्वच्छता म्हणजे का चैन? साबण ही आवश्यक वस्तू आहे; तुम्ही मंजुरी द्या.’
‘मी समजा दिली. परंतु आश्रमातील सर्वांना ही गोष्ट पसंत न पडली तर? तुम्ही एक करा. अनुकूल बहुमत मिळवा. अनुकूल सह्या घेऊन या, जा.’
‘ते आमचं काम.’ बाळ उडी मारून म्हणाला आणि त्या बालवीरांनी आश्रमवासीयांच्या भरपूर सह्या मिळविल्या. सर्वांनाच साबण हवा होता. नको कोण म्हणेल? म्हणजे गांधीजींना का ती मंडळी भीत होती? परंतु मुलांनी निर्भय वातावरण आणले. ते सह्या घेऊन गांधीजींकडे गेले.
‘बापूजी, ह्या घ्या सह्या.’ विजयी वीर म्हणाले.
‘साबण मंजूर.’ बापू हसून म्हणाले.