बापूजींच्या गोड गोष्टी 80
८२
ईश्वरावर श्रद्धा ही एक जिवंत गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे : ‘प्राण गेला तरी निष्ठा जाता नाही कामा.’
‘तुका म्हणे व्हावी प्राणांसवे ताटी
नाही तरी गोष्टी बोलू नये।’
देवाविषयी, श्रद्धेविषयी उगीच कशाला बोलता? प्राणांची ताटातूट झाली तरी बेहत्तर, अशी तयारी असेल तर अशा गोष्टी बोला. तुकारामाचे हे शब्द खरे आहेत.
गांधीजींची ईश्वरावर अशीच निष्ठा होती. तो तारणारा, तो मारणारा. साबरमतीचा आश्रम नुकताच सुरू झाला होता. आश्रमात कोणी हरिजन आले तर त्यांनाही घेऊ, ते म्हणाले. आणि एक हरिजन कुटुंब आले. महात्माजींनी त्याला घेतले. अहमदाबादची सनातनी मंडळी रागावली. व्यापारी लोक मोठे धर्मिष्ठ. आश्रमाला मदत कोण देणार?
महात्माजींचे पुतणे मगनलाल. आश्रमाची ते व्यवस्था ठेवणारे. दक्षिण आफ्रिकेपासून महात्माजींच्या साधनेत ते समरस झालेले. महात्माजींना चरखा हवा होता तर मगनलाल गुजरातभर हिंडले. ‘रेंटिया सापडला!’ असे मगनलाल उद्गारले. ते एके दिवशी सायंकाळच्या प्रार्थनेनंतर बापूंना म्हणाले : बापू, उद्या आश्रमात खायला काही नाही. पैसे तर शिल्लक नाहीत. काय करायचं?’
‘चिंता नको करू, प्रभूला काळजी आहे. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ असं त्यानं म्हटलं आहे.’ बापू शांतपणे म्हणाले.
आणि त्या दिवशी रात्री कोणी व्यापारी आला. त्याने आश्रम पाहिला आणि दहा हजार रुपये तो देऊन गेला!
एकदा कोणीतरी गांधीजींना प्रश्न केला: ‘तुम्ही स्वत:चा विमा का नाही उतरीत?’
‘परमेश्वरावर श्रद्धा आहे म्हणून.’ ते म्हणाले.