बापूजींच्या गोड गोष्टी 25
२६
महात्माजींनी स्वदेशीचा अर्थ व्यापक केला. वंगभंगाच्या वेळेस स्वदेशीचा मंत्र जन्मला. महाराष्ट्रात सार्वजनिक काकांनी ह्याच्याआधी पंचवीस-तीस वर्षे त्याचा घोष केला होता. मँचेस्टरच्या कपड्यापेक्षा येथील गिरणीचे कापड वापरणे म्हणजे स्वदेशी. परंतु येथील गिरण्यांच्या कपड्यापेक्षाही खेड्यांतील लोकांनी बनविलेली खादी वापरणे अधिक स्वदेशी, शंभर टक्के स्वदेशी, असे गांधीजींनी सांगितले. ज्यामुळे खेड्यांतील जनतेच्याच हातात अधिक पैसा पडेल ते अधिक स्वदेशी. देशी साखर खाणे चांगले, परंतु गूळ खाऊन खेड्यांत अधिक पैसा राहात असेल तर गूळ खाणे अधिक स्वदेशी. महात्माजींनी स्वदेशीत अधिक अर्थ ओतला. शब्दांचे अर्थ युगानुयुगे वाढत असतात. आपण प्रथम स्वातंत्र्य असे म्हणत असू. स्वातंत्र्य म्हणजे परकी सत्ता जाणे असे म्हणत असू. परंतु तेवढा पुरेसा नाही. स्वातंत्र्य म्हणजे पिळवणूक नाहीशी होणे, गरिबांचे संसार सुखाचे होणे एवढा अर्थ त्यात आता आला आहे.
त्या वेळेस महात्माजी मला वाटते बार्डोली तालुक्यात होते. त्यांच्या दर्शनाला हजारो स्त्री-पुरुष येत, पावन होऊन जात. एके दिवशी महात्माजींना कोणी तरी भेट आणली. कोणी आणली ती भेट? एका ताटावर आच्छादन होते. एका भगिनीने महात्माजीसमोर ते ताट ठेवले. काय होते त्या ताटात? ते ताट रुपयांनी भरलेले होते. रुपयांनी भरलेली ती थाळी महात्माजींसमोर ठेवून ती उभी राहिली.
महात्माजींनी क्षणभर त्या भगिनीकडे पाहिले. नंतर गंभीरपणे म्हणाले, ‘माझ्यासमोर तू अशी उघडी काय आलीस, तुला काही वाटत नाही?’ सारे चकित झाले. त्या भगिनीने आपले वस्त्र कोठे फाटलेले नाही ना वगैरे पाहिले. ती तर नवीन सुंदर वस्त्र नेसून आली होती. कोणाच्या लक्षात अर्थ येईना. महात्माजी म्हणाले, ‘माझ्या म्हणण्याचा अर्थही तुमच्या लक्षात येत नाही. आपली सर्वांचीच बुद्धी जणू जड झाली आहे. ही भगिनी उघडी आहे, म्हणजे अंगावर वस्त्र नाही, असा अर्थ नव्हे. परंतु हे विलायती वस्त्र आहे. तुमची अब्रू विलायती व्यापा-यांनी झाकायची. उद्या तिकडून कपडा आला नाही की तुमची अब्रू कशी झाकली जाणार? परावलंबी लोक उघडे आहेत. म्हणून ज्याने त्याने स्वत:च्या हातच्या सुताची खादी वापरावी. आपली अब्रू आपल्या हाती ठेवावी. जो आपली अब्रू दुस-याच्या हाती देतो तो फजीत होतो.’
महात्माजींच्या बोलण्यातील गंभीर भाव लक्षात येऊन सारे खाली मान घालून उभे राहिले. आपण त्या शब्दांतील गंभीरता कधीही विसरता कामा नये. अन्नवस्त्राच्या बाबतीत, व्यक्ती-निदान ते ते प्रादेशिक घटक स्वयंपूर्ण बनविले पाहिजेत. नाहीतर दुरून अन्न नाही आले, उपासमार; दुरून कपडा नाही आला, उघडे राहणे- अशी आपत्ती येईल.