बापूजींच्या गोड गोष्टी 27
२८
आपला देश गरीब आहे. कोणतीही उपयुक्त वस्तू येथे फुकट दवडणे म्हणजे राष्ट्राची हानी आहे. त्यातून खाण्यापिण्याच्या वस्तू फुकट दवडणे म्हणजे तर पाप होय. जुनी माणसे एखादा तांदूळ, डाळीचा कण रस्त्यात पडलेला दिसला तरी उचलत असते.
ते १९३० मधील दिवस. महात्माजींची ती ऐतिहासिक दांडीयात्रा सुरू झाली होती. ८० सत्याग्रही बरोबर घेऊन सत्याग्रहाचा संदेश देत महापुरुष पायी निघाला होता. समुद्राकाठी दांडी येथे जाऊन महात्माजी सत्याग्रह करणार होते. मीठ हातात घेऊन रावणी राज्य समुद्रात बुडवितो, म्हणणार होते. महात्माजींचे पायी प्रयाण म्हणजे एक महान राष्ट्रीय यात्रा होती. हजारो लोक त्या ठिकाणी जमत. महात्माजींचा संदेश ऐकत. देशी-विदेशी वार्ताहरांची गर्दी असे. ते पुण्यदर्शन होते.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. नदीच्या पात्रात टरबुजे-खरबुजे इत्यादी फळे तयार होण्याचे ते दिवस होते. एका मुक्कामी जनतेने गाड्या भरभरून ती उन्हाळी फळे आणली होती. खाईना तो भिकारी! महात्माजींच्या बरोबरीचे लोक खाऊन खाऊन किती खाणार? ती फळे तेथे फुकट जात होती. कोणी अर्धवट फेकून देत होते. त्या सुंदर रसाळ फळांचा असा नाश होत होता.
आणि महात्माजींनी ते दृश्य पाहिले. ती नासाडी पाहून त्यांना दु:ख झाले. ते गंभीर झाले. त्यांच्या भाषणाची वेळ झाली. हजारो स्त्री-पुरुष बापूंची पुण्यवाणी, स्वातंत्र्याची अमर हाक कानी यावी म्हणून तेथे जमलेले होते. महात्माजी आसनावर बसले. आज ते काय बरे सांगत आहेत? ऐका. ‘मी हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयला पत्र लिहिलं की, जनतेचं उत्पन्न रोज सरासरीनं दोन आणे असता तुम्ही रोज सातशे रुपये पगार घेणं बरोबर नाही. जनता एका रुपयात आठ जणांचं पोट भरणार. तुमच्या सातशे रुपयांत पाच-सहा हजार लोकांचं पोट भरेल. म्हणजे तुम्ही पाच-सहा हजार लोकांचं अन्न खाता. मी व्हाइसरॉयसाहेबांस देशाचं दारिद्र्य कळवलं. त्यांच्या उधळपट्टीवर मी टीका केली. परंतु आज इथं काय पाहिलं? शेकडो फळांची मी नासाडी पाहिली. माझ्या बरोबरच्या मित्रांसाठी फळं आणायची होती तर थोडी आणायची. परंतु गाड्याच्या गाड्या भरून तुम्ही आणलीत. मी व्हाइसरॉयांना कोणत्या तोंडानं नावं ठेवू? अशी उधळपट्टी करणं पाप आहे, आणि माझी मान तर तुम्ही खाली केली आहे. देशात एकीकडे उपासमार आहे, लोक अर्धपोटी आहेत. आणि इथं माझ्या स्वातंत्र्ययात्रेत अशी नासाडी होत आहे. माझी वेदना मी कशी प्रकट करू! पुन्हा असं पाप करू नका.’
त्या व्याख्यानाच्या वेळेस सारे श्रोते खाली मान घालून ऐकत होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. महात्माजींच्या एकेका शब्दांत त्यांचा दु:खी आत्मा जणू ओतलेला होता. त्या दिवशींचे ते भाषण ज्यांनी ऐकले ते ते कधीही विसरणार नाहीत. ती अमर अशी उदबोधक वाणी होती.