बापूजींच्या गोड गोष्टी 38
३९
पुण्याला १९३२ मध्ये हरिजनांना स्पृश्य हिंदूंपासून कायद्याने कायमचे अलग करू नये, म्हणून महात्माजींनी उपवास सुरू केला. मग पुणे करारा झाला. पुढे तुरुंगातून हरिजनांसाठी हरिजन वर्तमानपत्रात लिहिण्याची परवानगी मागितली. ती पण मिळेना म्हणून त्यांनी उपवास सुरू केला. त्यांना सोडून देण्यात आले. परंतु ते कायदेभंग करायला निघाले. कारण लढा सुरू असताना ते बाहेर कसे राहणार? सरकारने पुन्हा पकडले. पुन्हा लिहिण्यासाठी परवानगी. पुन्हा उपवास. सरकार तप दुराग्रही, हट्टी, एक प्रकारे निर्लज्ज. शेवटी महात्माजींनीच. सरकारने बाहेर सोडल्यावर जाहीर केले की, ‘वर्षभर मी तुरुंगातच आहे असं समजेन. इतर राजकीय कार्य करणार नाही, हरिजनांचंच काम करीन.’ आधी एकवीस दिवसांचा तेथे पर्णकुटीत त्यांनी उपवास केला आणि नंतर ते हिंदुस्थानच्या दौ-यावर निघाले. तोच त्यांचा प्रसिद्ध अस्पृश्यता निवारणाचा दौरा होय. दौरा मध्यप्रांतातून सुरू झाला. मध्यप्रांताचे सिंह बॅ. अभ्यंकर त्यांच्याबरोबर होते.
आज नागपूरला सभा होती. लाखो लोक जमले होते. महात्माजींना थैली अर्पण करण्यात आली. त्या वेळेस बॅ. अभ्यंकरांच्या पत्नीने अंगावरचे दागिने दिले.
‘बापू, हे शेवटचे दागिने. माझ्या पत्नीजवळ आता दागिना उरला नाही.’
‘ठीक. परंतु तुम्हांला अजून जेवण मिळण्याची तर चिंता नाही ना? अभ्यंकरांना जेवणही मिळणे कठीण झाले आहे, असं ऐकेन त्या दिवशी मी आनंदाने नाचेन.’ गांधीजी म्हणाले.
बापूजींचे ज्यांच्यावर प्रेम असे त्यांच्यापासून ते जास्तीत जास्त त्यागाची अपेक्षा करीत.