बापूजींच्या गोड गोष्टी 81
८३
श्री. घनश्यामदास बिर्ला आणि गांधीजी यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध. बिर्लांनी ‘बापू’ म्हणून सहृदय पुस्तकही लिहिले आहे. एकदा बिर्लांनै बरे नव्हते. बापूंनी त्यांना लिहिले : ‘सेवाग्रामला या. उपाय करतो.’ गांधीजी जन्मजात वैद्य. राजेंद्रबाबू, नरेंद्र देव कितीकांची तरी ते सेवाग्रामला शुश्रूषा करायचे, उपाययोजना करायचे. सर्वांविषयी त्यांचा समभाव. महान नेता असो, भांडवलदार असो, लहान बालक असो, कोणत्याही पक्षाचा असो. त्यांचे प्रेम, त्यांचा स्नेह सर्वांसाठी. सूर्याचे किरण राजवाडा असो वा झोपडी असो, सर्वत्र समभावाने पडतात.
महात्माजी बिर्लांना बोलावत होते. परंतु बिर्ला संकोचत होते. सेवाग्रामला भंगी नाहीत, आश्रमीय मंडळीच सारे भंगीकाम करणार; आणि बिर्ला जेथे राहणार, त्या भागातील स्वच्छता, तेथील आरोग्य यांची जबाबदारी महादेवभाईंवर असणार. बिर्लांना भंगीकाम आवडत नसे. आणि आपले भंगीकाम महादेवभाईंना करायला लागावे हा विचार त्यांना सहन होत नव्हता. म्हणून ते सेवाग्रामला येत ना.
परंतु गांधीजींची नि त्यांची गाठ पडली.
‘या ना सेवाग्रामला. तुम्हांला बरा करतो. माझे उपाय सुरू करतो.’ बापू म्हणाले.
बिर्लांनी आपली अडचण सांगितली.
‘भंगीकाम का वाईट? कितना अच्छा काम!’ महात्माजी म्हणाले.
महादेवभाईंना हसू आले. गांधीजीही हसले; परंतु गांधीजी कोणावर लादीत नसत. दुस-याची भावना ते ओळखीत, त्या भावनेची कदर करीत.
‘तुम्ही या. तुमच्यासाठी एक भंगी काही दिवस नेमू’ बापू म्हणाले.
आणि बिर्ला आले. काही दिवस एका खास भंग्याची योजना करण्यात आली. असे होते सर्वांना सांभाळणारे बापू!