बापूजींच्या गोड गोष्टी 60
६२
त्या वेळेस महात्माजी इंग्लंडमध्ये होते. १९३१ मधील ही गोष्ट आहे. महात्माजींच्या रक्षणासाठी म्हणा किंवा त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी म्हणा, एक गुप्त पोलीस नेहमी त्यांच्या वास्तव्याच्या जागी असे. गांधीजींचा उघडा व्यवहार, लपवाछपवी कसलीच नाही. सत्य सूर्यप्रकाशासारखे असते. ते अंधारात कधी लपून बसत नाही. सत्य निर्भय असते. त्याला लपायची इच्छाही नसते.
तो गुप्त पोलीस तेथे कंटाळला. कारण तेथे त्याला काम काहीच नसे. महात्माजींच्या कामात तोही मदत करू लागे. कधी सामानसुमान लावी, कधी इतर काही करी. प्यारेलालजींना, मीराबेनना तो म्हणायचा, ‘मलाही काही काम द्या, संकोच करू नका.’ तो गोरा गुप्त पोलीस बापूंचे थोडे तरी काम मिळावे, म्हणून उत्सुक असे. काम मिळाले तर तो आनंदाने फुलून जाई.
लंडनमधील महात्माजींचे काम संपले. गोलमेज परिषदेसाठी ते गेले होते. हिंदुस्थानचा प्रश्न सोडवायला ते गेले होते. परंतु स्वातंत्र्याची वेळ आली नव्हती. ब्रिटिशांची कारस्थाने, हिंदी पुढा-यांचे आपसातले मतभेद, हे सारे पाहून महात्माजी विटले. सर्वांचा निरोप घेऊन ते हिंदुस्थानला परत यायला निघाले. आवराआवर झाली. लहान इंग्रज मुले महात्माजींभोवती घुटमळत होती.
इतक्यात एक बडा अधिकारी आला.
‘आपल्यासाठी आणखी काही करायला हवं आहे का? सारी सोय झाली ना? काही त्रास नाही ना पडला?’ त्याने विचारले.
‘सारं ठीक आहे. आणखी काही नको. मला एकच मागणं मागायचं आहे.’
‘कोणतं? मागा. संकोच का?’
‘हा जो इथं तुमचा गुप्त पोलीस असतो, त्याला माझ्याबरोबर ब्रिंडिसीपर्यंत येऊ दे. पाठवाल त्याला? नाही म्हणू नका.’
‘कशासाठी?’
‘तो आता माझ्या कुटुंबातलाच आहे. म्हणून येऊ दे तेथवर बरोबर.’
‘न्या तर मग.’
तो गोरा पोलीस फार आनंदला. ब्रिंडिसीपर्यंत तो महात्माजींच्या बरोबर गेला. तेथे प्रणाम केला. महात्माजींनी त्याचा पत्ता घेऊन ठेवला.
पुढे महात्माजी हिंदुस्थानात आले. ते आले तो येथे भडका उडालेला होता. भेटीसाठी व्हाइसरॉयसाहेबांना गांधीजींनी दोन तारा केल्या. भेटीला साहेबाने नकार दिला. पुन्हा सत्याग्रह सुरू झाला. गांधीजींना येरवड्यात ठेवण्यात आले.
राष्ट्राचा सारा संसार शिरावर असणारे महात्माजी! परंतु ते त्या गो-या गुप्त पोलीसाला विसरले नव्हते. त्यांनी त्याला एक घड्याळ भेट म्हणून पाठवले. त्याच्यावर त्यांनी ‘प्रेमाची भेट’ असे खोदवून खाली आपले नावही खोदवून घेतले होते.
ती प्रेमाची भेट मिळाल्यावर त्या इंग्रज गुप्त पोलिसाला केवढी कृतार्थता वाटली असेल!