बापूजींच्या गोड गोष्टी 94
९७
महात्मा गांधीजी सेवाग्रामला होते. जमनालालजी इतर सर्व व्याप सोडून गोरक्षणाला वाहून घेणार होते. त्या विचाराने त्यांना वेडे केले होते. परंतु जमनालालजी अकस्मात आजारी झाले. डॉक्टर धावले. सेवाग्रामहून महात्माजी आले. जमनालालजी बरे नाही झाले. देवाघरी गेले. विनोबाजी म्हणाले; ‘त्यांच्या मनात जे विचार उसळत होते ते देहात मावू शकले नाहीत. देह फाडून ते बाहेर निघाले.’ गांधीजी अती दु:खी झाले. वास्तविक ते स्थितप्रज्ञ. परंतु गांधीजींच्या जीवनात करुण मानवता होती. दिवस गेला. परंतु त्या दिवशी रात्री गांधीजींना झोप आली नाही. म्हणाले; ‘मी निराधार झालो आता. माझा बोजा कोण सांभाळील?’
९८
महात्माजींच्या जीवनसाधनेत सहस्त्रावधी लहान थोर जगभर सामील झालेले होते. परंतु मगनभाई तर सेवकांचे मुकुटमणी! महात्माजींच्या मनात एखादा विचार येताच तो प्रत्यक्षात आणण्यासाठी मगनलालभाई सारी अंतर्बाह्य शक्ती ओतायचे. १९२८ मध्ये ते देवाघरी गेले. ‘मंगल मंदिर खोलो’ (देवा, तुझं मंगल दार उघड) हे स्वकृत भजनगीत आळवीत ते देवाघरी गेले.
महात्माजींचे दु:ख असीम होते. ते म्हणाले, ‘त्याच्या मरणाने मी विधवा झालो!’
९९
अजून साबरमती आश्रम सुरू झाला नव्हता. आहमदाबादचा एक भाग कोचरब. तेथे आश्रम होता आणि काशीहून विनोबाजी महात्माजींचे दर्शन घ्यायला निघाले. बनारस हिंदू विद्यापीठातील गांधीजींचे ते तेजस्वी भाषण विनोबाजींनी ऐकले होते. जे हवे होते ते जणू त्यांना मिळाले. गांधीजींबरोबर त्यांचा पत्रव्यवहार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ते येत होते.
विनोबाजी आले तो त्यांना काय दिसले? महात्माजी विळी घेऊन भाजी चिरीत होते. भाजी चिरता चिरता उभयतांचे बोलणे सुरू होते गीतेवर- ईश्वरी श्रद्धेवर, बोलणे चालले होते.
‘ईश्वरावर श्रद्धा ठेवून जो जगतो, कार्य करतो, रामनाम हा ज्याचा आध्यात्मिक चारा, तो कधीही आजारी पडणार नाही.’ महात्माजी म्हणाले.
‘होय.’ विनोबाजी म्हणाले.
महात्माजींची रामनामावरची श्रद्धा दिवसेंदिवस वाठतच गेली. व दिल्लीच्या अखेरच्या उपवासात ती पराकोटीला पोचली होती.