बापूजींच्या गोड गोष्टी 65
६७
बापूंना लहान मुलांचे फार वेड आणि मुलांचेही बापूजींवर फार प्रेम. सेवाग्रामला बापूजींची नातवंडं असायची. ती बापूंना सतवायची.
तो एक लहान दीड वर्षाचा नातू. तो गांधीजींच्या समोर उभा रहायचा आणि सारखा बापूजी, बापूजी अशा हाका मारायचा. गांधीजी ओ नाही द्यायचे. जवळची सारी ती गंमत पाहून हसू लागत.
गांधीजी १९४४ मध्ये सुटल्यानंतर शांतिनिकेतनला गेले होते. जवाहरलालजींची मुलगी इंदिरा तेथे होती. तिचा लहान मुलगा राजीव. गांधीजींना बघताच राजीव म्हणाला, ‘जयहिंद!’ आणि हृदय उचंबळून बापू त्याला म्हणाले, ‘जयहिंद राजीव!’
एकदा सेवाग्रामला गांधीजी फिरयला गेले होते. फिरण्य़ाच्या वेळेसही मुलाखती चालायच्या. गांधीजी दिल्लीला जाणार असे बोलण्यात येत होते. बरोबरच्या नातवाने प्रश्न केला :
‘बापूजी तुम्ही दिल्लीला जाणार, होय ना?’
‘हं बेटा.’
‘का बरं जाता?’
‘व्हाइसरॉयना भेटायला.’
‘नेहमी तुम्ही त्यांना भेटायला जाता. ते व्हाइसरॉय तुम्हांला भेटायला का येत नाहीत?’
तो प्रश्न ऐकून सारे हसले आणि बापूजींनी त्या नातवाच्या पाठीवर थप्पड मारली!
बापू तेव्हा पाचगणीला होते. दादरचे मोतीवाले लागू मुलासह त्या वेळेस पाचगणीला गेले होते. एकदा गांधीजी फिरायला निघाले आणि लागूंचा मुलगा बरोबर होता. गांधीजींची काठी त्याने हातात घेतली. एक टोक त्याच्या हातात, दुसरे गांधीजींच्या- आणि तो पळू लागला. बापूही पळू लागले. त्या वेळेचा तो फोटो आजरामर आहे.
‘नेत्याला नेणारा मुलगा’ असा तो फोटो तुम्ही पाहिला असेल.
आणि गांधीजी तेव्हा जुहूला होते. १९४४ नंतरचीच गोष्ट. प्रार्थना जुहूला होई. मुंबईहून हजारो लोक प्रार्थनेला जात. एके दिवशी एक मुलगा दादरहून पायी निघाला. फळे आणि फुले घेऊन निघाला आणि तो जुहूला आला. बापूंना तो भेटला. त्यांच्या पायी त्याने फुले वाहिली आणि फळे समोर ठेवली.
राष्ट्रपित्याने त्याला जवळ घेतले, त्याला आशीर्वाद दिला. बापूंचा परम मंगल हात पाठीवर फिरणे याहून अधिक थोर भाग्य ते कोणते?