बापूजींच्या गोड गोष्टी 87
८९
त्या आगाखान पॅलेसमधील उपवासाच्या वेळचीच एक गोष्ट. बाहेरच्या लढ्याचे तंत्र गांधीजीना पसंत नव्हते. गुप्तता त्यांना नको असे. काँग्रेसच्या नावावर काही होऊ नये अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. हे सारे असले तरी स्वातंत्र्याच्या लढ्याची त्या महापुरुषाला केवढी तहान!
एके दिवशी आपल्या मनातील भावना ते बोलून गेले : ‘इतक्यात राष्ट्र कसं थकलं? इतर राष्ट्रं वर्षानुवर्ष लढत आहेत, भारतानं का इतक्यात थकावं?’ असे ते म्हणाले.
एकदा म्हणाले : ‘व्हाइसरॉयच्या बंगल्यासमोर जाऊन डोकं आपटून लोकांनी प्राण द्यावा. अत:पर गुलाम राहणं नको. मरण पत्करलं,- असं जनतेनं घोषवावं.’ पुन्हा म्हणाले, ‘याला कोणी आत्महत्या म्हणेल. परंतु आत्महत्याही शूराची असू शकते, जपानी लोकांच्या हाराकिरीनं हे दाखवलं आहे.
महात्माजींचे ते तीव्र शब्द बाहेर आमच्या कानांवर येत. देश स्वतंत्र व्हावा, दास्याची लोकांना चीड यावी म्हणून महात्माजींना किती तूव्रता वाटे, ते या उद्गारांवरून दिसून येते.