बापूजींच्या गोड गोष्टी 14
१५
महात्माजींना आपण भगवान बुद्ध किंवा येशू ख्रिस्त यांची उपमा देत असतो. भगवान बुद्धाप्रमाणे यज्ञातली हिंसा बंद करण्यासाठी महात्माजी ‘मलाच बळी द्या’ असे म्हणाले, ते मागे मी सांगितले. येशू ख्रिस्त, ज्यांना सर्वांनी टाकलेले असे. त्यांची सेवा करीत. महारोग्यांची सेवा करीत गांधीजीही असेच सेवामूर्ती होते. चंपारण्यातील ती करुणगंभीर गोष्ट आहे. तीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. किसान सत्याग्रह चालू होता. महात्माजींच्या सत्याग्रहत सर्वांना भाग घेता येतो. लष्करी लढ्यात बंदूक चालविणारेच उपयोगी. परंतु रामनाम लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनी घ्यावे, त्याचप्रमाणे सत्याग्रहात स्त्रिया, पुरुष, म्हातारे, मुले, अशक्त, दुबळे इत्यादी सर्व आपापल्या आत्म्याच्या जोरावर भाग घेऊ शकतात. सत्याग्रहात तमाम जनता सामील होऊ शकते. चंपारण्यातील त्या सत्याग्रही सेनेत महारोगाने पिडलेला एक शेतमजूर होता. तो पायांना चिंध्या गुंडाळून चाले. त्याच्या टाचा सोलून निघाल्या होत्या, सुजल्या होत्या. अपार वेदना होत असत. परंतु आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर तो महारोगी झुंजार सत्याग्रही बनला होता.
एके दिवशी संध्याकाळी सत्याग्रही सैनिक छावणीत परतत होते. त्या महारोगी सत्याग्रहीच्या पायाच्या चिंध्या रस्त्यात सुटून पडल्या. त्याला चालवेना. टाचांतून रक्त येत होते. इतर सत्याग्रही पुढे गेले. महात्माजी सगळ्यांच्या पुढे असायचे. महात्माजी फार झपाट्याने चालत असत. दांडीमार्चच्या वेळेसही बरोबरचे ८० सत्याग्रही मागे रेंगाळू लागत, परंतु महात्माजी झपझप पुढे जात. चंपारण्यात असेच होई. मागे राहिलेल्या त्या महारोगी सत्याग्रहीची आठवण कोणालाच राहिली नाही.
आश्रमात पोचल्यावर प्रार्थनेची वेळ झाली. बापूजींच्याभोवती सत्याग्रही बसले. परंतु बापूंना तो महारोगी दिसला नाही. त्यांनी चौकशी केली, शेवटी एकाने सांगितले : तो जलद चालू शकत नव्हता. थकल्यामुळे तो झाडाखाली बसला होता.’
एक शब्दही न बोलता गांधीजी उठले. हातात दिवा घेऊन ते शोधार्थ बाहेर पडले. तो महारोगी रामनाम घेत एका झाडाखाली विव्हळत होता. बापूंच्या हातातील दिवा बघताच त्याचे तोंड आशेने फुलले. भरल्या आवाजाने ‘बापू!’ अशी त्याने हाक मारली.
‘अरे तुला चालवत नव्हतं तर मला नाही का सांगायचं?’ असे गांधीजी म्हणाले. त्याच्या रक्ताळलेल्या पायांकडे त्यांचे लक्ष गेले, तो महारोगी होता. इतक सत्याग्रही किळस येऊन मागे झाले. परंतु गांधीजींनी शाल फाडून त्याचे पाय गुंडाळले. त्याला आधार देऊन ते त्याला आस्ते आस्ते आश्रमात, त्या शिबिरात घेऊन आले. नंतर त्यांनी त्याचे पाय नीट धुवून काढले. प्रेमळपणे त्यांनी त्याला स्वत:च्या जवळ बसविले. भजनास सुरुवात झाली. प्रार्थना झाली. तो महारोगीही भक्तीप्रेमाने टाळ्या वाजवीत होता. त्याचे डोळे घळघळत होते. त्या दिवशीची ती प्रार्थना किती गंभीर असेल, भावपूर्ण असेल! नाही? असे होते आपले बापू!