बापूजींच्या गोड गोष्टी 92
९४
१९०८ मधील गोष्ट. लोकमान्यांना इकडे सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि तिकडे आफ्रिकेत महात्माजीही तुरुंगात होते. जोहान्सबर्गच्या तुरुंगात इतर कैद्यांमध्येच त्यांना ठेवण्यात आले. ज्या दिवशी प्रथम त्यांना कोठडीत ठेवण्यात आले त्या दिवशी त्यांच्या हृदयात वादळ होते. इतर कैदी वाटेल ते बोलत होते, चावटपणा करीत होते, महात्माजी रात्रभर जागे राहिले. ती रात्र ते कधीही विसरले नाहीत.
हळूहळू त्यांची वृत्ती शांत झाली. कैदी-कपडे अंगावर असत. सक्तमजुरीची शिक्षा होती. खडी फोडण्याचे काम देण्यात आले होते. एके दिवशी खडी फोडता फोडता त्यांच्या हातांतून रक्त येऊ लागले.
‘बापूजी, पुरे करा काम. बोटातून रक्त येत आहे.’ बरोबरचे सत्याग्रही म्हणाले.
‘जोवर हात काम करीत राहील, तोवर करीत राहणं हे माझं कर्तव्य.’ असे म्हणून तो महान सत्याग्रही खडी फोडतच राहिला.
तुरुंगात असताना एकदा त्यांना कोर्टात कसल्या तरी साक्षीसाठी नेण्यात आले होते. काही मित्र कोर्टात आले होते. ‘मी आनंदी आहे.’ ते म्हणाले. काम संपताच पोलीस पहा-यात ते निघाले. युरोपियन मुले गांधीजींवर प्रेम करणारी. ती मागोमाग जात होती. परंतु बापूंनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. ध्येयसिद्धीसाठी पेटवाव्या लागणा-या यज्ञाकडे का त्यांची दृष्टी होती. महात्माजींच्या मनातील भाव कोणाला कळणार?