बापूजींच्या गोड गोष्टी 19
२०
महात्माजी स्वच्छतेचे परम भोक्ते. स्वच्छता म्हणजे प्रभूचे रूप. आपल्या देशआतील जनतेला स्वच्छता म्हणजे परमात्मा हे अजून शिकायचे आहे. घरात आपण स्वच्छता ठेवू; परंतु सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव आपणास अद्याप यावयाची आहे. गांधीजींचे सारे जीवनच अंतर्बाह्य शुची आणि निर्मळ. त्यांचा लहानसाच पंचा, परंतु तो किती स्वच्छ असे.
त्या वेळेस महात्माजी येरवड्याच्या तुरुंगात होते. त्यांनी मुद्दाम काम मागून घेतले होते. ते कपडे शिवीत. महात्माजी म्हणजे थोर कर्मयोगी. एके दिवशी जेलचे मुख्य अधिकारी गांधीजी जेथे बसत, सूत कातीत, तेथपर्यंत आले. अधिका-यांनी चौकशी केली. प्रसन्न मुखाने, विनोदाने बापूंनी उत्तरे दिली. थोड्या वेळाने अधिकारी निघून गेले, तेव्हा मग गांधीजी उठले. त्यांनी बादली भरून आणली. सुपरिटेंडेंट बूट घालून जेथे आले होते तेथील जागा त्यांनी पाण्याने धुवून काढली. सारवली, स्वच्छ केली.
‘गांधीजी, हे काय?’ कोणी विचारले.
‘ही तर माझी बसण्या-उठण्याची जागा. ती स्वच्छ नको का ठेवायला?’
‘कुणी अस्वच्छ केली?’
‘सुपरिटेंडेंट इथं आले होते. आज ते बोलत इथपर्यंत आले. पायांतील बूट इथपर्यंत आले, म्हणून स्वच्छता करीत आहे.’
‘त्यांना तुम्ही का सांगितलं नाही? इथं एक पाटी लावू का, की पादत्राणं काढून यावं म्हणून?’
‘नको. ज्याच्या त्याच्या हे लक्षात यायला हवं, परंतु जाऊ दे. ब-याच दिवसांनी आज सारवलं. अशी संधी मला कोण मिळू देतो? सुपरिटेंडेंटसाहेबांचे आभारच मानायला हवेत की, अशी सुंदर करमणूक त्यांनी मला दिली. स्वच्छतेची सेवा हातून घडली.’
असे बोलून बापूंनी हसत हसत हात धुतले.