आस्तिक 154
प्रयोगपते, मधूनमधून असें कसोटी घेणारें प्रसंग येतीलच. त्या त्या काळीं निरनिराळया वेषांत निरनिराळया मिषांनी कांही वक्रतुंड नेहमी राहतीलच तुझ्या प्रयोगाला विरोध करण्यासाठीं उभें. ते आपापल्या समूहांना दुस-यांपासून सर्वस्वी अलग राहावयास शिकवतील. लहान लहान मुलांची मनें द्वेषानें भरूं पाहतील. रात्रंदिवस सर्वांच्या कानींकपाळीं 'द्वेष, द्वेष', 'सूड सूड' म्हणून ओरडत राहतील. परंतु मनुष्यांतील सदंशावर, मनुष्यांतील मांगल्यावर श्रध्दा ठेवणारे थोर आस्तिकही त्या त्या काळीं उभे राहतील. आणि शेवटी सर्वांना सांभाळूं पाहणा-या ऐक्याचा विजय होईल. जीवनाचें स्वरूप शेवटीं संहार हें नसून सहकार्य हें आहे ही गोष्ट सर्वांना पटेल. द्वेष सदैव विजयीं होऊं शकत नाहीं. आत्म्याला सर्वांना भेटण्याची इच्छा असते. कोंडी फोडून उड्डाण करण्याचा त्याचा स्वभाव आहे. कवची फोडून, अंडें फोडून पक्षी बाहेर पडतो व अनंत आकाशांत नाचूं-गाऊं लागतो, त्याप्रमाणें मानवी आत्माहि सर्व कृत्रिम बंधनें तोडून पंख फडफडवून बाहेर पडेल. द्वेषाचींच उपनिषदें पसरवणारे वक्रतुंड सरळ होतील. उच्च ध्येयासाठीं ज्या वेळीं आस्तिकांसारखी एखादी महान् विभूति शांतपणें प्राणयज्ञ करावयास उभी राहतें, त्या वेळीं सर्व लोक गंभीरपणें, उत्कटपणें विचार करूं लागतात आणि त्या विभूतींभोंवतीं गोळा होतात. उदात्त त्याग शेवटीं विजयी होतो. सकल चराचरासाठीं रात्रंदिवस जळणा-या सूर्याभोंवतीं इतर ग्रहोपग्रह शेवटीं प्रदक्षिणा घालूं लागतात व त्याच्यापासून प्रकाश घेऊन प्रकाशमान होतात. सर्वोदयासाठी निरपेक्षपणें सर्वस्वाचा होम करणा-यांच्या भोंवती मानवी समाज शेवटीं प्रदक्षिणा घालील. अशा रीतीनें विरोधांतून शेवटीं विकासच विजयी होऊन बाहेर पडेल. म्हणून तूं कधीहि निराश होऊं नकोस. घाबरूं नकोस. सत्प्रवृत्तींवर विश्वास ठेवून काम कर. शेवटीं सत्याचा जय होईल, यावर श्रध्दां ठेव. सत्कर्मासाठीं धडपडत राहा. मानवांना प्रेमानें जवळ आणण्यासाठीं झट. एकमेकांचा चांगुलपणा पाहावयास शिकव. या सुंदर व विशाल भारतदेशांत मानवैक्याचा प्रयोग संपूर्णपणें यशस्वी होईल. तो यशस्वी झालेला माझ्या डोळयांना दिसतहि आहे !'
'प्रभो, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करूं. अशक्य वाटणारें शक्य करूं. मानव शेवटीं अंतर्यामीं एक आहे हे सर्वांना कळून पराकोटीचा आनंद होईल. देवदेवा, तूं चिंतनांत रमून जा. आम्हीं तुझे पाईक काळजीपूर्वक-श्रध्दापूर्वक प्रयोग परिपूर्णतेला नेल्याशिवाय राहणार नाहीं. या भव्य व सुंदर भारत देशांत तो प्रयोग शेवटच्या परिणत दशेला आला कीं आम्ही तुला हांक मारूं प्रयोगाचें हें फळ पिकून गोड झालें कीं तें तुझ्या मंगल चरणीं वाहूं व कृतार्थ होऊं.' प्रयोगपति म्हणाला.
प्रभुनें चिंतनसिंधूंत पुन्हां बुडी घेतली. प्रयोगपति पुन्हां पुढील कार्याला लागला. महान् देवदत्त कार्य ! देवाचा महान् भारतीय प्रयोग !