आस्तिक 108
'देवाची पूजा करतांना मरण आलें तर काय वाईट ? ती तर खरी पूजा होईल. पण मी रात्रीं जात जाईन पूजेला, म्हणजे कोणी बघणार नाहीं. जाऊं ना आई ? रोज जात जाईन.' ती म्हणाली.
'एकटी का जाणार ? ' आईनें विचारलें.
'देवाचें नांव व मी ह्या माळाहि आहेत ना बरोबर ? एकटी कशी ? भक्त कधीं एकटा नसतो.' ती म्हणाली.
'कृष्णे, आपणां सर्वांना लौकरच येथून जावें लागेल. नको हें आर्यांचें राज्य; प्राणांवर पाळी यायची. आपले लोक म्हणत होते.' आई म्हणाली.
'तुम्ही जा सारीं. मी येथेंच राहीन. येथल्या रानांत राहीन. रानांत राहून देवाची भक्ति करीन. त्याला फुलें वाहीन. त्याला प्रदक्षिणा घालीन. तुम्ही जा. तुमचा सांभाळ व्हावा म्हणून मी देवाची प्रार्थना करीन.' कृष्णी म्हणाली.
त्या दिवशीं रात्री कृष्णी त्या पुष्पमाला घेऊन शेतावर आलीं. तिनें झोपडीच्या दारावर हारांची तोरणें. काय आहे हा प्रकार ? त्याला भीति वाटली. ते हार घेऊन तो सुश्रुतेकडे गेला.
'आजी, आजी, कांही तरी चमत्कार आहे.' तो म्हणाला.
'काय रे आहे ? वत्सला व नागानंद चमत्कार करीत आहेत. प्रेमळ बाळें. त्या दिवशीं यात्रेंत गर्दीत घुसली म्हणतात. वत्सला प्रेमाचे गाणें म्हणत होती. नागानंद बांसरी वाजवीत होते मारामारी म्हणे थांबली. सर्वत्र हिंडत आहेत दोघें. आणखी का कांही चमत्कार कळला ? ' तिनें विचारलें.
'तसला नाहीं चमत्कार; परंतु शेतावर चमत्कार. कांही दिवसांपूर्वी माझ्या अंथरुणावर सकाळीं उठावें तो फुलें पडलेलीं असत. ती म्हणें 'येतात कशी ? परंतु फुलांऐवजी आतां हार येऊं लागले. काल रात्रीं झोंपडीच्या दारावर तोरणें होती. फुलांच्या माळांची सुंदर तोरणें आणि अंथरुणावर एक पुष्पमाला ? मला भीति वाटते. काय आहे हें ?' तो म्हणाला.
'कधीं, कधीं गंधर्व असें करतात म्हणून ऐकलें होतें. त्यांतला तर नसेल प्रकार ? सुश्रुता म्हणाली.
इतक्यांत कृष्णीची आई सुश्रुतेकडे आली. ती बाहेर उभी राहिली. ती कांही बोलेना.
'काय हवें ? ' कार्तिकानें विचारलें.