आस्तिक 30
'अंगावर वीज पडून. एकदा भर पावसाळा होता. आमच्या गांवी एक बाई आजारी होती. ताप होता तिच्या अंगांत. फार ताप. आम्हीं शीतला-देवीचीं गाणीं म्हटलीं. परंतु ताप हटेना. तिला वाटलें कीं, आपण मरणार. नागदेवाकडे जाणार. तिचा मुलगा दुस-या गांवी होता. मुलाला भेटायची तिची इच्छा होती. परंतु कोण जाणार निरोप घेऊन ? माझ्या आईजवळ ती म्हणाली, 'तुम्ही माता आहांत. मातृहृदय तुम्ही जाणतां. तुम्ही जा व माझ्या मुलाला घेऊन या.' माझी आई निघाली. मी घरीं निजलेला होतों. मी एकटाच होतों. आईनें मला उठवलें नाहीं. ती मध्यरात्रीं निघाली. मुसळधार पाऊस पडत होता. आकाश धरणीमातेला भेटण्यासाठी वांकत होतें. संपूर्णपणे भेटण्यासाठीं टाहों फोडीत होतें. रडत होतें. मुलासाठीं माता रडत होती. त्या मातेसाठी माझी आई जात होती. अंधाराला वाट विचारीत जात होती. झगझग करणा-या विजेला वाट विचारीत होती. सकाळीं मी उटलों, तों आई जवळ नाहीं. मी त्या तापानें फणफणणा-या आईकडे गेलों. तिने सांगितलें सारें. बराच वेळ झाला तरी आई येईना. मला धीर निघेना. इतक्यांत त्या मातेचा मुलगा गांवाहून आला. धांवतच आला. त्याची आई उठली व तिनें त्याला जवळ घेतलें. परंतु माझी आई कोठें होती ? मला जवळ घेणारी आई कोठें होती ? त्या मुलानें सांगितलें कीं, ती दोघें बरोबर येत होती. परंतु अंधारात पावसांतून येतां येतां रस्ता चुकला. त्यानें एका ठिकाणीं थांबून हांका मारल्या. परंतु उत्तर मिळालें नाहीं. येईल मागून असें समजून तो आला निघून. परंतु आई आली नाहीं. मी कावराबावरा झालों. त्या बाईचा मुलगा व मी पाहावयास निघालों. पाऊस थांबला होता. वाटोवाट झाडे पडली होती; माझी आई एके ठिकाणी पडलेली दिसली ! परंतु तिच्यांत प्राण नव्हता. मीं तिला मिठी मारली. परंतु ती हंसेना, उठेना. तो म्हणाला, 'वीज पडली अंगावर.' माझी आई गेली. दुस-या एका मातेच्या जीवनांत आनंद ओतण्यासाठीं ती मरण पावली. त्या प्रळयकाळच्या रात्रीं ती भ्याली नाहीं. हृदयांत अपार सेवा भरलेली असती कीं, सर्वत्र मित्र दिसतात. अंधार मित्र वाटतो, कांटे फुलांप्रमाणे वाटतात, संकट सखा वाटतें. माझी आई ! माझी आई ! कधीं भेटेल पुन्हां माझी आई ?' नागानंदाने करुण असा प्रश्न केला.
क्षणभर सारीं गंभीर होऊन उभी राहिलीं.
'शीतलादेवीचीं गाणीं म्हणतां म्हणजे काय करतां?' वत्सलेने विचारलें.
'आम्ही झाडांचे पल्लव तोडून आणतों. पानांचे द्रोण करून त्यांत पाणी भरतो. नंतर गाणीं म्हणत आजा-याभोंवती फिरतों. पल्लवांनी द्रोणांतील पाणी शिंपडतों.' नागानंदाने सांगितलें.
'त्यांतलें एखादें गाणें म्हणा ना.' ती आग्रहपूर्वक म्हणाली.