आस्तिक 128
आस्तिकांच्या आश्रमांत बाळ शशांक आजारी होता. तापानें फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होतीं. त्यांना निरोप पाठविण्यांत आला होता, परंतु तो केव्हां मिळणार ?
'शशांका, बरें वाटतें का ?' आस्तिकांनी त्याच्या तप्त मस्तकावर हात ठेवून विचारिलें..
'भगवन् तुम्हांला त्रास. तुम्ही जा ना तिकडे. इतर मुलांना कांही सांगा. माझ्यामुळें सर्वांचें नुकसान.' शशांक म्हणाला.
'शशांका, आश्रमांत दुसरें काय शिकायचें आहे ? दुस-याच्या सुखदु:खात भागीदार व्हावयास शिकणें हेंच खरें शिकणें. तुझी सेवाशुश्रूषा करणें हेच या वेळचें शिक्षण. मी तुझ्या सेवेंत गुंतलों असतां तिकडे सर्वांनीं शांतपणें रोजची कामें करणें हेंच शिक्षण. शिक्षण म्हणजे रोज का कांही उपदेश हवा ? खरें शिक्षण म्हणजे एक प्रकारची दृष्टि. ती आली म्हणजे मुख्यमहत्त्वाचे शिक्षण झालें. तू मनाला लावून घेऊं नकोस. कपाळावर पुन्हां भस्म व दहीं घालूं का ? गार वाटेल.' आस्तिकांनी गोड शब्दांत विचारिलें.
'हं घाला. तुम्हींच घाला. मघां नागेशनें घातलें, तर डोळयांत गेलें. पण मी बोललों नाहीं. तो मला आवडतों. माझे मघां पाय चेपीत होता.' शशांक म्हणाला.
'सेवा त्यानेंच करावी. तुला दूध दिलें का त्याने ?' त्यांनी विचारिलें.
'हो, दिलें.' तो म्हणाला.
आस्तिकांनी एका द्रोणांत दहीं व भस्म कालविलें. त्याचा कपाळावर लेप दिला. थंडगार वाटलें. वेदांतील सुंदर सुंदर मंत्र आस्तिक तेथें म्हणत होते. मधून मधून उपनिषदांतील भाग म्हणत. मंगल गंभीर असे तें वेदपारायण वाटें.
'किती छान आहेत हे मंत्र ! सारें आपलें गोड." शशांक म्हणाला.
'होय. या द्रष्टया ऋषींची दृष्टि वस्तूच्या अंतरंगात गेली आहे. त्याला सर्वत्र मधु दिसत आहे. माधुर्यसागर परमेश्वर दिसत आहे. त्या ऋषीला उषा गोड आहे, निशा गोड आहे, एवढेंच नव्हे तर
'मधुमत्वपार्थिवं रज:'