आस्तिक 64
'तुम्ही आज उजाडत कशाला आलांत ? सारें लुगडें तुमचें भिजून गेलें. गवताची खाज लागली असेल. मी तुमच्याकडे रोज सकाळीं येतों तों गवतानें पाय कसे ओले होऊन जातात. तें गवत का रडत असतें ? आतां लौकरच आम्हांला कापतील अशी का त्याला चिंता वाटते ? म्हणून का ते अपार अश्रु ? तें सारें गवत एकमेकांच्या अंगावर पडून, मुक्यानें रडत असतें. रोज तुमच्याकडे येतांना तें गवत, तें रडणारें गवत, माझ्या चरणावर मान टाकून पडतें. परंतु तें तुडवून मला यावें लागतें.' तो म्हणाला.
'तुमच्यां पायां पडणा-यांना तुम्ही तुडवणार का ? त्यांना रडवणार का ? नाग का निष्ठुर असतात ?' तिनें त्यांच्याकडे पाहून विचारिलें.
'पण आज उजाडत कां आलांत ?' त्यानें विचारिलें.
'शेताचें सौंदर्य पहावयास आलें. सूर्याचीं उगवती शोभा पाहावयास आलें. आश्रमांत असतांना मी लौकर उठत असें. दंवबिंदूंचे हार घालून येणा-या उषादेवीला उचंबळून येऊं बघत असें. परंतु घरीं आल्यापासून अंथरुणांतच लोळत पडलेली असतें. आज आळस फेंकून दिला. प्रभातकाळचा वारा नवजीवन देत होता. मला तरतरी वाटली. उत्साह वाटला. वाटे, रोज उठावें व येथें यावें. तुम्ही तिकडे दूध, फुलें, भाजी घेऊन येण्यापेक्षां मीच नेत जाईन. मलाहि कांहीं काम रूं दे. तुम्ही फुलांची परडी भरून ठेवीत जा. दुधाचें भांडे भरून ठेवीत जा. मी नेईन्. तुमच्या हातची फुलें, ती मी घेऊन जाईन. माझ्या केसांत घालीन. तुम्ही येथें गाईच्या गळयातहि माळा घालता. वत्सलेच्या गळयाची कां नाहीं तुम्हांला आठवण येत ? माझा गळा का वाईट आहे ? हा पाहा कसा शंखासारखा शुभ्र आहे ! माझ्या गळयांत घाला ना माळा ! कोण घालणार माझ्या गळयांत माळ ? तुमच्या गळयांत घालण्यासाठी त्या दिवशी मी हार केला होता. परंतु तुम्ही न सांगता निघून गेलां होतात. तो हार मी खुंटीवर ठेवून दिला. तुमच्यासाठी केलेला पहिला हार ! हृदयाची सारी कोमलता व मधुरता ओतून गुंफलेला हार ! तो वाळून गेला. सुकून गेला. नंतर मी रोज हार करीत असें व कपोताक्षीच्या हाती देत असें. ही नदी कपोताक्षी तुम्हाला ते हार कोठें तरी देईली असे मनांत येई.' वत्सला थांबली. तिला बोलवेना.
'कपोताक्षीच्या प्रवाहांत एके दिवशी मी डुंबत होतों. तों आले खरे हार. सरिन्मातेच्या प्रेमांत डुंबत होतों. मी उताणा पोहत होतों. वरून सूर्याचे किरण मुखावर नाचत होते. खालून लाटा मला नाचवीत होत्या. तों एकदम डोक्यावरच्या केसांत कांही गुंतलें असें वाटलें. साप कीं काय असे वाटलें ! नागपूजक असलों तरीहि भीति वाटली. श्रध्दा कोठें आहे ? मी एकदम उपडा झालों. घाबरलों. डोक्यावरून हात फिरवला. तों साप नाहीं, कांही नाहीं. फुलांचा सुंदर हार होतो. माझ्यासाठी सापाचा का हार झाला, असें मनांत आलें. मी तो हार घेऊन कपोताक्षीच्या प्रवाहांतून बाहेर आलें. तो हार हुंगला. हृदयाशीं धरला. तो हार हृदयाशी धरून किती वेळ उभा असेन तें देवाला माहीत !' नागानंदानें ती आठवण सांगितली.