आस्तिक 153
प्रयोगपति अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच तें जगण्याचा आनंद. इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना ? आर्य व नागयांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार कीं तुफान वादळांत बुडणार ? अशीं धास्ती वाटूं लागली होती. प्रयोगपतीच्या श्रध्देची परीक्षा होती. त्यानें प्रयत्न सुरू ठेवले. श्रध्देस यश आलें. पहिलें पाऊल टाकण्यांत आलें.
प्रयोगपतीनें परमेश्वरांस मंगल गीतांनी जागें केलें. प्रभु चिंतनांतून उठला. प्रयोगपतीचें आनंदी मुख पाहून त्याला समाधान वाटलें.
'पहिला प्रयोग पार पडला ना ?' प्रभूनें विचारिलें.
'होय, देवा ! ' प्रयोगपति नम्रपणें म्हणाला.
प्रभु म्हणाला, 'प्रयोग पुढें चालूं दें. आणखी अन्य मानवी प्रवाह या भरतभूमींत आण. ऐक्याचें पाऊल आणखीं पुढें पडूं दे. नाना धर्म, नाना संस्कृति येऊं देत हळूहळू एकत्र. प्रथम प्रथम स्पर्धा होईल, झगडें होतील. परंतु त्यातून शेवटीं परमैक्य प्रकट होईल. माझ्या दृष्टीला तें सर्व संस्कृतीचें ऐक्य दिसत आहे. भरतभूमीत ती माझी इच्छा तृप्त झालेली मला दिसत आहे. आर्य व नाग यांच्या ऐक्यांत किती अडचणी आल्या ! परंतु त्या कांहीच नव्हतं. पुढें याहून मोठया अडचणी येतील. ज्या नागांची व आर्यांची आज एकी झाली त्यांतूनहि पुढें निराळें प्रश्न उत्पन्न होतील. आर्य लोक नागांची संस्कृति आत्मसात् करितील, परंतु नागांना खालीं खालीं लकटतील. त्यांना एक प्रकारे ठिकठिकाणीं अस्पृश्य करितील. त्यांच्या शेतीभाती जप्त करितील. त्यांना केवळ परावलंबी करितील. त्यामुळे आर्य व नाग यांच्या झगडयांऐवजीं स्पृश्य व अस्पृश् या नांवाने झगडा सुरू होईल. परंतु त्यानें घाबरून जाण्याचे कारण नहीं. कांही उदार स्पृश्य ह्या अस्पृश्यांना पुन्हां प्रेमानें जवळ घेऊं पाहतील. परंतु मग अस्पृश्यच रागावून दूर राहूं लागतील. ते म्हणतील, 'आम्ही अलगच राहूं.' परंतु त्यांचा हा राग हळूहळू दूर होईल. प्रथम आई रडणा-या मुलाला घेत नाहीं. मग ती त्याला घेऊंन गेली तर चिडलेलें मूल आईजव जात नाहीं. तसेंच हें आहे. परंतु शेवटी मायलेकरें एकत्र येतीलच. तसे हे प्रवाह पुन्हां जवळ येतील. तसेच हिंदु व मुसलमान असे झगडें होतील. हिंदु-मुसलमान प्रथम लढतील. भांडतील. परंतु मागून ते एकमेकांची संस्कृति अभ्यासूं लागतील. एकमेकांच्या सुंदर चालीरीति घेतील. एकमेकांच्या निरुपद्रवी धार्मिक आचारविचारांना मान्यता देतील. एकमेकांच्या साधुसंतांना भजतील. परंतु पुन्हांहि कोणी मध्येंच व्यत्यय आणतील. पुरी होत येणारी इमारत ढांसळूं लागेल. या देशाचीं शकलें करण्याचे विचार उत्पन्न होतील. प्रयोगपते, तुझे हजारों वर्षांचे प्रयत्न मातींत मिळतील, असें तुला वाटेल. सर्वांना अंधार घेरील. कसें पाऊल टाकावें असा विचार पडेल. परंतु ह्या देशाचे तुकडे करा असें म्हटलें जातांच झोपलेंलेहि जागे होतील. न बोलणारेही बोलू लागतील. सर्व सत्प्रवृत्तीचे लोक पांगलेले होते ते एक होतील. म्हणतील, नाहीं होऊं देणार तुकडे. आम्ही एकत्र राहूं. परस्परांचे मांगल्य पाहूं. तडजोड करूं. हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिश्चन सारे उठतील व ऐक्याचे प्रयत्न करूं लागतील.