आस्तिक 98
'काय रे, शशांक ? आंब्याची कैरी अगदी लहान असते तेव्हां कशी लागते ? ' आस्तिकांनी प्रश्न केला.
'अगदीं तुरट असते.' तो म्हणाला.
'जरा मोठी झाली म्हणजे कशी लागते ? ' पुन्हां त्यांनीं विचारलें.
'आंबट लागते. ' तो म्हणाला.
'आणखी मोठी झाली म्हणजे ? ' त्यांनी हंसून प्रश्न केला.
'फारच आंबट लागते. दांत आंबतात.' तो म्हणाला.
'आणि कैरी पिकून आंबा झाला म्हणजे ? ' त्यांनी विचारलें.
'गोडगोड लागतो. कसा वरती तांबूस, पिवळसर रंग. कसा आंत गोड सुंदर रस.' शशांक म्हणाला.
'शशांक, तुरट फळें आंबट होतात, आंबट पुढें गोड होतात. तसेंच माणसांचे आहे. वाईट माणसें पुढे चांगली होतील. जसजसे त्यांना अनुभव येत जातील, तसतशीं तीं शहाणीं होतील. कैरी आंबट म्हणून जर तोडून फेकूं तर पुढे रसाळ आंबा मिळणार नाहीं. खरे ना ? ' आचार्यांनी विचारलें.
'कैरी दोनतीन महिन्यांत पिकते, गोड होते. माणसे किती दिवसांनी पिकणार, गोड होणार ? '
'किती का दिवस लागेतना ? प्रत्येक मनुष्याचें जीवन एक दिवस पिकणार आहे ही गोष्ट विसरतां कामा नये. मीहि पिकेन, तोहि पिकेल. सारे गोड आंबे होतील.' आस्तिक म्हणाले.
'आंबट कैरी गोड होते. कोरडी नदी भरून येते.' शशांक म्हणाला.
'वठलेलीं झाडें पल्लवित होतात, रात्र जाऊन प्रकाश येतों.' रत्नकांत म्हणाला.
'लहान फळ मोठें होतें, लहान नदी मोठी होते.' शशांक म्हणाला.
'कळींचे फूल, फुलांचें फळ.' रत्नकांत म्हणाला.