आस्तिक 142
ते म्हणाले, 'आपण आश्रमांत, 'असत्याकडून आम्हांस सत्याकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने' अशी प्रार्थना करीत असूं. त्या प्रार्थनेचे फळ आज मिळत आहे. आज आपण देहावर स्वार होत आहोंत. हा देह ध्येयाचें साधन आहे हें जयाला कळलें त्याने अमृतत्व मिळविलें. लांकूड ज्याप्रमाणे चुलींत घालावयाचें असतें, त्यांप्रमाणे हा देह ध्येयासाठीं आगींत घालावयाचा असतो. आज आपण तें करीत आहोंत. देहाची आसक्ति सोडणें म्हणजेच असत्यांतून सत्याकडें जाणें. या तीन्ही वचनांचा एकच अर्थ आहे. या तीन्हीं वाक्यांचा आज साक्षात्कार करून घ्यावयाचा आहे. या साक्षात्काराचा आनंद ज्याच्या डोळयांसमोर उभा राहिला, त्याला न भीति न चिंता. तो ध्येयप्राप्तीच्या आनंदांत मस्त असतो.
जनमेजयाविषयीं आपल्या मनांत द्वेष-मत्सर नको. तो निमित्त म्हणून आपल्या ज्ञानाची परीक्षा घ्यावयास उभा राहिला आहे. पूर्वी विश्वामित्रांनी वसिष्ठांची अशीच परीक्षा घेतली होती. त्यांचे मुलगे विश्वमित्रानें मारले, तरी वसिष्ठ शांत राहिले. ज्या वेळीं माता अरुंधती म्हणाली, 'चांदणें कसें शुभ्र पडलें आहे !' त्या वेळीं महात्मा वसिष्ठ म्हणाले, 'विश्वामित्राच्या तपासारखें हें चांदणें आहे.' स्वत:चे शंभर मुलगे ज्यानें मारले, त्याच्या विषयीहि वसिष्ठांचे कसे हे कौतुकाचे उद्गार ! ती परंपरा आपण पुढें चालवूं.
परमेश्वराने सृष्टि निर्माण केली. सृष्टि निर्माण करून त्यानें मानवांजवळ यज्ञ हें साधन दिलें. 'या यज्ञानें सर्व मिळवून घ्या' असें त्यानें सांगितलें. हे यज्ञसाधन मानवांजवळ आहे कीं नाहीं याची तो मधून मधून परीक्षा घेत असतो. मानवाची नाडी धड आहे कीं नाहीं हें तो पाहात असतो. आज अंधकार दिसत आहे. द्वेष भरपूर वाढला आहे. उपाय काय ? बलिदान. स्वेच्छेचे बलिदान. आपण आज परमेश्वराला दाखवूं या कीं यज्ञसाधन जिवंत आहे. त्याची उपासना आमच्यांत अद्याप आहे. परमेश्वर पाहील व प्रसन्न होईल. जनमेजयाचें हृदया पुन्हा द्रवेल. नवीन उज्ज्वल भविष्य सुरू होईल. चला आपण यात्रेकरूं आहोंत. सत्यदेवाचे यात्रेकरूं. मानवजातीची ही महान् यात्रा कधींच सुरू झाली आहे. कधीं संपेल तें मी काय सांगू ? परंतु 'आपण या सत्यदेवाचें यात्रेंत सामील झालों होतों', एवढं प्रत्येकाला जर म्हणतां येईल तर किती सुंदर होईल !
सारे सिध्द व्हा. नम्रपणें, निरहंकारपणें, प्रेमळपणें, भक्तिभावानें, ध्येयानंदाच्या कल्पनेनें नटून, हृदय उचंबळून, अनासक्तपणें, निर्भयपणें प्रयाणार्थ सिध्द व्हा. ॐ शांति: शांति: शांति: ! ! ! '
आश्रमांत वृध्द नकुल राहणार होता. आश्रमांतील हरणांची, गाईंची, मोरांची तो काळजीं घेणार होता. फुलझाडें, फळझाडें यांची निगा राखणार होता.
'नकुल, माझ्या हरणाला मारूं नका हं. तें मला इकडेतिकडे शोधतील. निघून जायचें हो एखादें व वाघ खायचा त्याला. त्याला माझा विसर पाङ तें हिरवें गवत खाणार नाहीं. त्याला म्हण, 'शशांकने खा असें सांगितलें आहे.' म्हणजे खाईल. आणि मीं लावलेल्या त्या पुन्नागाला पाणी घाल. लहानसें आहे झाड, परंतु लौकरचं त्याला फुलें येतील. पुन्नागाचीं फुलें कशी छान दिसतात ! मला आवडतात,' शशांक सांगत होता.