आस्तिक 47
'मिठाचें का पाणीं लावलेस ? वेडीच आहेस तूं.' आजी म्हणाली.
'झोंबलें का हो ?' तिनें विचारिलें.
'खारट पाणी डोळयांना झोंबत नहीं. उलट त्यानें डों स्वच्छ होतात. देवानें डोळे धुण्यासाठी खारट पाण्याचेच हौद भरून ठेवले आहेत. भीष्मांना ज्याप्रमाणें पाताळांतील सजीव पाण्याची तहान होती, त्याप्रमाणें जीवाला कधीं कधीं हृदय-पाताळांतील ह्या खारट पाण्याची जरुरी असते. त्यानें डोळे उघडतात. तोंडे फुलतात. नीरस होऊं पाहणा-या जीवनांत चव उत्पन्न होते, रस उत्पन्न होतों.' नागानंद म्हणाला.
'तुम्हीसुध्दां कां आजारी होता ? वाळलेले दिसतां.' आजीनें विचारिलें.
'ते लांबून आले आहेत. प्रवासमुळे क्षीण आला असेल. सकाळीं बघ ताजेतवानें दिसतील. बटमोग-याच्या फुलाप्रमाणें दिसतील.' ती हंसून म्हणाली.
'काळया बटमोगरीच्या फुलाप्रमाणें ?' तो मंद स्मित करीत म्हणाला.
'काळा बटमोगरा असतो का तरी ? नागांच्या उपवनांतून असतो वाटतें? तिनें थट्टेनें विचारिलें.
'नागांच्या उपवनांत सारें असतें. जें मनात येईल तें तेथें फुलवतां येतें. सारे मनाचे रंग. मन आपला रंग वस्तूला देतें. हवा असेल तो रंग. मन आपला रंग वस्तूला देतें. हवा असेल तो रंग. मन म्हणजे मोठा जादूगार, मोठा चित्रकार. मन म्हणजेच ब्रह्मदेव, मन म्हणजेच सृष्टीचें तत्त्व. संकल्पाशिवाय सृष्टि नाहीं. मनाशिवाय संकल्प नाहीं.' नागानंद म्हणाला.
'तुम्ही का आश्रमांत होतां कुठें ? तत्त्वज्ञान्यासारखी भाषा बोलतां. वत्सलाहि पूर्वीं असें बोले. परंतु तिची ती भाषा हल्ली मुकी झाली आहे. हल्लीं तिची निराळीच भाषा माणसे निरनिराळया वेळीं निरनिराळीं भाषा बोलतात.' सुश्रुता म्हणाली.
'परंतु त्या निरनिराळया भाषांतून हृदयाचे रंग प्रकट होत असतात. एकाच हृदयाचे रंग, एकाच आत्म्याची नानाविध दर्शनें. आपल्या सर्व व्यवहारांतून आपलें अनंत जीवन' तो म्हणाला.
'कोठल्या आश्रमांत होतां बरें ? मागें नदीवर कार्तिकाला तुम्हीं सांगितलें होतें की आश्रमांत होतो म्हणून.' वत्सलेनें आठवण केली.