आस्तिक 13
शेतांतील धान्य वाढावे म्हणून, तृण आपण उपटून फेंकून देतों. मोत्यासारखें, सोन्यासारखें धान्य तृणावर करुणा करूं तर मिळेल का ? जे उच्च आहेत, त्यांच्या विकासासाठी नीचानें नष्ट झालें पाहिजे. आर्याची संस्कृति वाढावी, आर्यांचा समाज एकत्र पसरावा, आर्यांच्या मुलाबाळांना राहायला नीट घरदार असावें, सुंदर शेतीभाती असावी, यासाठी अनार्यांनी नष्ट झालें पाहिजे. त्यांना आपण सामावून घेऊं शकणार नाही. त्यांच्यांत व आपल्यांत काडीचें साम्य नाही. त्यांच्याशी मिळतें घेणे म्हणजे आपण खाली येणें. दुस-याला तारायचें असेल तर त्यांच्याबरोबर बुडून कसें चालेल ? आपण अलग राहिलें पाहिजे. राजा, तो आस्तिक मोठा बोलघेवडा आहे. त्यानें आर्य व नागतरुणांना प्रेमाचा उपदेश चालविला आहे. 'एकत्र नांदा, परस्परांचे चांगलें घ्या' असा ते प्रचार करतात. परंतु ह्यांत धोका आहे. आस्तिक ! नांव पाहा घेतलें आहे केवढे ! त्याचे मूळचें नांव निराळें होतें म्हणतात. परंतु हा स्वत:ला आस्तिक म्हणवूं लागला. 'सर्वत्र मांगल्य आहे असें मानणारा तो आस्तिक. मी ते मानतों म्हणून मी खरा आस्तिक आहे; बाकीचे नास्तिक' अशी प्रौढी तो मिरवतो. राजा, अशांच्या नांदी लागूं नकोस. तुझ्या हृदयांतील प्रेरणेला सत्य मान. कोटयवधि आस्तिकांपेक्षा हृदयांतील प्रेरणा अधिक महत्त्वाची आहे. त्या प्रेरणेचा आत्मा मारू नकोस.' वक्रतुंड आपले उपनिषद् सांगत होता.
"भगवान् आस्तिकांना त्यांच्या मायबापांनीच आस्तिक नांव ठैवलें होतें. त्यांची माता नागकन्या होती. त्यांचे वडील आर्य ऋषि होते. ज्या वेळी या संकरसंभवसंतानाला आर्य नावें ठेवूं लागले तेव्हा,'हा आस्तिक आहे. सर्वांचे ठायी हा मांगल्य पाहील व इतरांस दाखवील.' असें त्यांचा पिता म्हणाला. तेव्हांपासून आस्तिक नांव प्रसृत झालें. कांही असों. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य आहे असें वाटतें. त्यांचे ते डोळे म्हणजे जणूं प्रेमाचीं सरोवरें वाटतात. आपल्या जीवनांतील सारे विरोध त्यांच्या दर्शनानें मावळतात. वासंतिक वा-याची झूळूक येऊं लागताच वठलेली झाडें टवटवीत दिसूं लागतात, त्याप्रमाणें आस्तिकांच्या कृपाकटाक्षाचा वारा लागतांच आपल्या जीवनांतील रखरखीतपणा नष्ट होऊन, तेथें मळें पिकले आहेत बागा फुलल्या आहेत असें वाटूं लागतें. वक्रतुंड, तुमचा प्रसार तुम्ही निरनिराळया आश्रमांतून चालू ठेवा. आधीं ऋषिमहर्षींना पटलें पाहिजे. राजानें एकदम कोणताहि पक्ष स्वीकारूं नय. जनतेत कोणता वारावाहत आहे तें राजानें बघावें.' परीक्षिति म्हणाला.
"राजानें बघूं नये, त्यानें वळण लावावें. जें योग्य वाटतें तें जनतेला करायला लावावें.' वक्रतुंड त्वेषानें म्हणाला.
"परंतु योग्य काय तें कोणी ठरवायचें ? ते एकदम थोडेंच ठरवतां येत असतें ? प्राचीन काळीं मोठमोठया चर्चा होत; विद्वत्सभा भरत; जनता ऐकायला जमे; स्त्रियाहि वाद करीत. अशा रीतीनें विचारमंथन झालें पाहिजे. मी बोलावूं अशी विद्वत्-परिषद् ? आस्तिक वगैरे सर्व महान् महान् आचार्यांना आमंत्रणें देतों. आहे तुमची तयारी ? बोला ! ' परीक्षितीनें विचारले.