आस्तिक 50
'तुम्ही जेवा हो पोटभर.' वत्सला म्हणाली.
'त्यांना संकोच वाटत असेल अजून.' सुश्रुता म्हणाली.
'संकोच कशाचा ? संकोच वाटता तर येथें येते का ? आलां असतां का हो ? हंसू नका. खरें सांगा.' वत्सलेनें विचारिलें.
'मला हंसू नको म्हणतेस आणि तूं कां हंसतेस ? मला तुझ्याकडे बघून हंसू येतें.' तो म्हणाला.
'मी विदूषक आहें वाटतें ? सोंग आहें वाटतें ?' तिनें चिडून म्हटलें.
' सोंग नाहीं तर काय ? सारें गांव हंसतें तुला.' आजी म्हणाली.
'तुम्हीं दोघांनी मला रडवायचें ठरविलें वाटतें ?' ती म्हणाली.
'ठरवणार तरी केव्हां ? मी येथें नसतांना तर हे आले. आटप आतां. तेवढें दूध पी हो. तें नको टाकूं.' सुश्रुतेनें सांगितलें.
दोघांची जेवणें झालीं. सुश्रुतेनें नुसतें दूधच घेतलें.
'तुमचें पाय दुखत असतील ?' वत्सलेनें विचारिलें.
'नाहीं दुखत.' नागानंद म्हणाला.
'मग हातांनी कां बरें चोळीत होतां ?' तिनें प्रश्न केला.
'कांटा गेला आहे पायांत.' तो म्हणाला.
'अजून आंत आहे ?' तिनें काळजीपूर्वक विचारलें.
'हो, खोल गेला असेल. तसाच दडपीत आलों.' तो म्हणाला.
'मी काढतें हो. झोंप येणार नाहीं, नाहीं तर.' वत्सला म्हणाली.
'नको. मी सकाळी काढीन.' नागानंद म्हणाला.
'पण मला छान काढतां येतो.' ती म्हणाली.