आस्तिक 35
'या एका फळांत शेकडों बिया आनंदाने राहत आहेत. सहकार्यानें नांदत आहेत. या भूमीमध्येंहि तुम्ही सारें असेच आनंदानें राहा. नाग व आर्य भांडू नका. परस्पर सहकार्यांनें राहा. समजलें ना ?' आस्तिक म्हणाले.
'माझ्या तंत्रीचे असेंच आहे.' सुहास म्हणाला.
'काय आहे तुझ्या तंत्रीत ?' आस्तिकांनी प्रश्न केला.
'अनेक तारा, परंतु सर्वांच्या सहकार्यानें, संयमी वर्तनानें मधुर संगीत निर्माण होतें.' तो म्हणाला.
'असें तर सर्वत्रच आहे. या आश्रमांत अनेक वृक्ष आहेत, परंतु सर्व आनंदाने राहत आहेत. अनेक फुलझाडें आहेत, परंतु भांडत नाहींत. उलट नाना प्रकारची फुलें आपण लावतों व त्यामुळें अधिकच आनंद होतो. आपल्या नदीमध्यें अनेक लाटा एकमेकींत गमतीनें गुदगुल्या करीत असतात. एकमेकींच्या अंगावर नाचतात, कुदतात, मौज आहे.' हृषीकेश म्हणाला.
'वामन, तूं एक लहानसें रोपटें हळूच उपटून आण बघूं.' गुरुदेवांनी सांगितले.
वामन गेला व बरीचशीं रोपटीं उपटून घेऊन आला.
'अरे, एक सांगितलें ना ? बरें, राहूं दे. त्यातील एक हातांत घे. त्याला मुळें आहेत का ?' त्यांनी प्रश्न केला.
'हो, मुळांशिवाय कसें असेल तें ?' वामन हंसून म्हणाला.
'किती आहेत मुळें ?'
'अनेक.'
'कोणत्या दिशेला गेलेलीं आहेत ती ?'
'सर्व दिशांना.'
'यांतील अर्थ समजला का कोणाला ? कां सांगितलें हें रोपटें उपटून आणायला ? येते कोणाच्या ध्यानांत ?' गुरुदेवांनी विचारिलें.