आस्तिक 117
'आलांत एकदांचीं ? ' तिनें विचारिलें.
'आई, आलें; परंतु कायमची जावयाला आलें. मीं कार्तिकांची आज प्रेमपूजा केली. प्रेमाचा वसा एकदां घेतलां कीं सोडतां येत नाहीं. आई, आशीर्वाद दे.' कृष्णी म्हणाली.
'कृष्णे, माझा आशीर्वाद आहे. परंतु तुम्हीं विचार केला नाहीं. घाईनें सारें केलेंत. ' ती म्हणाली.
'आई, प्रेम सदैव पूर्णच असतें. तें नेहमीं बरोबर असतें. तें चुकत नाहीं. तें कधीं घाई करीत नाहीं, कधीं उशीर करीत नाहीं. वेळ आलीं कीं कळीं फुलते. प्रेमाला ना विचार ना मनन. तेथें एक सर्वस्वाचें अर्पण असतें. प्रेम पुढें बघत नाहीं, मागें बघत नाहीं. प्रेमाला सर्वत्र प्रकाशच दिसतो. गोड प्रकाश.' कृष्णी म्हणाली.
'कार्तिक,जनमेजयाचें अनुशासन तुम्हीं मोडलें आहे. नागकन्येंशी तुम्हीं विवाह करीत आहांत. तुम्ही दोघें अपराधीं आहांत. संकट येणार. कृष्णें, येथून सारी नागमंडळी उद्यां जाणार असें ठरत आहे. आणि आज तूं हे काय केलेंस ? तुम्हीं दोघें आमच्याबरोबर येणार का ? ' तिनें विचारिलें.
'मी कसा येणार ? सुश्रुता आजींना कोण ? नागानंद व वत्सला यांनी माझ्यावर ती जबाबदारी टाकिली आहे.' कार्तिक म्हणाला.
'टाकलेला विश्वास मोडतां कामा नये.विश्वासघतासारखें पाप नाहीं. तुम्ही येथून नये जातां कामा. आणि मीहि तुमच्याबरोबर राहीन. तुमचें माझें आतां लग्न लागलें. मंगलविवाह. आतां जीवन काय, मरण काय--सारें मंगलच आहे. आई, आम्हीं येथेंच राहूं. काय होणार आहे ? हजारोंचे होईल तें आमचें होईल.' कृष्णी म्हणाली.
'हजारोंचे काय होणार आहे ? ते हजारों तर जनमेजयाचें राज्य सोडून जात आहेत. मुद्दाम संकटांत कां राहावें ? सुश्रुता आजींसहि घेऊन जाऊं.' कृष्णीची आई म्हणाली.
'त्या कशा येतील ? नागानंद व वत्सला येथें आलीं तर ? आम्हीं येथेंच राहूं. कृष्णी मला धैर्य देईल. मला आगींत जाण्याचें, पुरांत उडी टाकण्याचें धेर्य देईल.' कार्तिक म्हणाला.
'आई, आम्हीं जातों.' कृष्णी म्हणाली.
'सुखीं असा.' ती म्हणाली.
कृष्णी व कार्तिक शेतांवर निघाली.