आस्तिक 101
नागांच्या देवतांची यांनी निंदा व विटंबना चालविली आहे साप मारतात व नाग देवांवर फेंकतात. हे आपल्या स्त्रियांची कुदशा करतात. प्रथम विश्वास दाखवतात, मग फसवतात, सोडून जातात. ते आर्यस्त्रियांचे स्थान नागस्त्रियांस देत नाहींत. आर्य जर असा आपला पाणउतारा करतात, सर्व बाजूंनी आपणांस हीन लेखतात, तर आपण कां त्यांच्यांत जावें ? नवीन सम्राट जनमेजय तर फारच नागांच्या विरुध्द आहे. तरी आपण सावध व्हावें. नागसंघटनेचा संदेश सर्वत्र न्या.' वगैरेत्याचे भाषण चाललें होतं. इतक्यांत गो-या आर्यांची एक तुकडी आली. पाठीवर भाता व काखेस धनुष्य असे ते आलें. त्यांच्याभोवती गर्दी झाली. त्यांचा नायक त्यांचे म्हणणें सांगूं लागला, 'आर्य स्त्रीपुरुषांनों, ऐका. या अशा नागांच्या उत्सवास येत जाऊं नका. नागलोकांत मिसळणें पाप आहे. नागपूजा करून दुष्ट व्हाल. वांकडीं होतील मनें. नाग ही नीच जात आहे. आपण श्रेष्ठ आहोंत. आपला वर्ण शुभ्र आहे. परंतु तो हळूहळू यांच्या मिश्रणानें काळा होईल. आपण ज्ञानाचें उपासक;गायत्री मंत्राचे उपासक. आपण आपला अध:पात नये करून घेतां कामा. आर्य कुमारिका नागांशी लग्नें लावूं लागल्या आहेत, ही फार वाईट गोष्ट आहे. एकेक आर्य तरुण अनेक आर्य कुमारिकांशी लग्नें लावण्यास सिध्द आहे. आर्यांत कुमार कमी ही अडचण सांगूं नये. आर्य कुमारांनींहि नागकन्यांशी संबंध ठेवूं नये. नागांप्रमाणे ह्या सर्व आर्य काळे करायचे असें मिष आहे त्यांच्या मनांत.' दोन विरुध्द भाषणें चालली होतीं. शेवटीं भांडणे सुरू झालीं. मारामारीवर पाळी आली. स्त्रिया मुलें घेऊन धांवपळ करूं लागल्या. म्हातारें गर्दीत गुदमरूं लागले. बाण लांबून मारता येतो. परंतु जवळून काय ? नाग तरुणांचे ते मुद्गल, त्या गदा आर्य कुमारांच्या मस्तकावर बसूं लागल्या. कोणी दगड मारूं लागलें. इतक्यांत एक आश्चर्य झालें. सुंदर गाणें कानांवर आलें. सुंदर बांसरी कानावंर आली. ती सुंदर होती स्त्री. ती गाणें म्हणत होती. तिचा पति बांसरी वाजवीत होता ती दोघें निर्भयपणें त्या गर्दीत घुसलीं. मधुर गान, मधुर तान ! मारणारें एकमेकांस मिठी मारूं लागलें. विरोध विसरले. द्वेष शमले. प्रेमाचें वातावरण भरलें. लोकांची तोंडे फुललीं. त्या दोघांच्या भोवती हजारों लोक उभे राहिले. मुलें नाचूं लागलीं. स्त्रिया नाचूं लागल्या. पुरुष नाचूं लागलें. नटराजाचा विराट् नाच ! आसपासचीं झाडें, दगडधोंडें सारे नाचत आहेत असें वाटलें. महान् संगीताचा सिंधु तेथें उचंबळला !
मंजुळ वाजे वंशी
दंश विसरले दंशी
द्वेष विसरले द्वेषी
महान् आश्चर्य झालें हो ॥
शस्त्रें गळलीं हातांतून
पाणी आलें डोळयांतून
प्रेम वाहें हृदयांतून
महान् आश्चर्य झालें हो ॥
शत्रुमित्र झाले समान
गळून गेले दुरभिमान
करिती मोक्षामृतपान
महान् आश्चर्य झालें हो ॥
वाजे नागानंदाची वेणु
प्रेमें नाचे अणुरेणु
अल्पशक्ति मी किती वर्णूं
मौन आतां वरतों हो ॥