आस्तिक 148
राजा, द्वेषानें द्वेष क्षमत नाहीं. मत्सरानें मरत नाहीं. तुमच्या आर्यांत जशा कांही सुंदर चालीरीति आहेत. तशा नागांतहि आहेत. तुम्ही दोघे एक व्हा. धर्म आणखीं वैभवशाली होईल. हिमालयाला शेकडों शिखरें आहेत, त्या सर्वांमुळें तो शोभतो. भारतीय धर्माला शेकडों सुंदर सुंदर विचारा-आचारांची शिखरें शोभोत. विविधता हें वैभव आहे; परंतु त्या विविधतेच्या पाठीमागे एकता मात्र हवी. एका वृक्षाच्या फांद्या, एका नदीचे प्रवाह, एका सागरांतील लाटा, एका अंबरांतील तारे, एका सतारींतील बोल!
राजा, आर्यांचा विष्णु व नागांचा सहस्त्र फणांचा नागदेव, येऊं देत दोन्ही दैवतें एकत्र. देव एकत्र आले कीं भक्तहि एकत्र येतील. शेषशायी भगवान् आपण निर्माण करूं. देवाचें वैभव वाढवूं. शेषाच्या आधारावर असणारा विष्णु. नागांच्या आधारानें जगणारें आर्य. नाग हे येथील. ते पाया आहेत. त्यांची मदत घ्या; सहकार्य घ्या. दोघे गोडीनें जगा. आर्यसंस्कृति व नागसंस्कृति एकत्र येवोत. दोहोंची एक नवीनच संमिश्र अशी संस्कृति होवो. शुभ्र गंगेंत काळी यमुना मिळून जाऊं दे. प्रवाह अधिक विशाल व गंभीर होऊं दे. पुढील पिढयांना आदर्श घालून ठेवा.
राजा, या पवित्र व सुंदर, समृध्द व सस्यश्यामल भूमींत अनेक जाती-जमाती येतील. तुम्ही आर्य आलांत, दुसरेहि येतील. या भूमीच्या प्रेमानें नाना धर्म येतील. उपाशी अन्नान्न राष्ट्रे या भारतमातेजवळ येतील. ती त्यांनाहि जवळ घेईल व पोशील. परंतु तुम्ही दूर दूर राहाल तर भांडाल व मातेला कष्टवाल. पुढील काळांत येणा-या नाना लोकांनी कसें वागावें त्यासाठीं आज तुम्ही उदाहरण घालून ठेवा.
एकमेकांना उच्चनीच समजूं नका. उगीच कुरापती काढूं नका. कलागती वाढवूं नका. मांगल्य निर्मिण्यासाठीं जगेल-मरेल तो खरा माणूस. जाती-जातींत सलोखा व स्नेह निर्माण करण्यांसाठीं जगेल-मरेल तो खरा मानव. मानव्याची महती स्वत: जीवनांत प्रकट करून ती दुस-यांनाहि पटवील तो खरा मनुष्य. या भारतांत नाना संस्कृतीचे लोक येणार. महान् वटवृक्षांवर शेंकडों रंगांची व नाना आवाजांची पाखरें येऊन बसणार. तो महान आहे म्हणूनच येणार. त्याचप्रमाणें हा देश महान् आहे. म्हणूनच येणार भिन्न भिन्न लोक. हे सारें भिन्न भिन्न लोक एकत्र येतील व शेवटीं विश्वसंग्राहक परममंगल संस्कृति निर्मितील. भरतभूमि मानव्याचें तीर्थक्षेत्र होईल. नाना संस्कृतीचें संमिश्र असें सहस्त्र पाकळयांचे कमलपुष्प फुलवतील.
राजा, अहंकारानें विकास थांबतो, वाढ खुंटते. संकुचितपणानें शेवटीं मराल, गुदमराल, सहानुभूतीशिवाय व सहकार्याशिवाय हे जीवन म्हणजे रखरखीत वाळवंट आहे. आपल्या थोर पूर्वजांनी 'शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्रा:' अशी सर्वांना हांक मारिली. 'अमृतस्य पुत्रा: न तु केवलं आर्याणां न तुनागानाम् ।' ज्या विश्वशक्तीनें आर्य निर्मिले, त्याच विश्वशक्तीने नागहि निर्मिले. जे तत्त्व आर्यांत आहे, तेंच नागांतहि आहे. आर्यांना भुकेसाठीं अन्न लागतें तसेच नागासहि लागतें. हें जो पाहील, तो खरा मनुष्य. तो डोळस. बाकीचे आंधळें, डोळे असून आंधळें !