आस्तिक 132
'यज्ञात् भवति पर्जन्य:।' महान् मंत्र. भगवंतांनी त्याच वेळीं सांगितलें आहे कीं जें जें पाहिजे असेल तें तें यज्ञानें मिळवून घ्या. यज्ञ म्हणजे कामधेनु, यज्ञ म्हणजे चिंतामणीं. करूं या आपण महान् यज्ञ. पेटवूं या ज्ञानमय प्रदीप.' आस्तिक म्हणाले.
'गुरुदेव, शशांक आपणांस बोलावीत आहे.' नागेशनें नम्रपणें येऊन सांगितलें.
'मी जाऊन येतों हं ! तुम्ही विचार करा. शशांक जरा आजारी आहे. नागानंद व वत्सला यांचा मुलगा. तुम्ही ऐकिलीं असाल त्यांची नांवें. थोर पवित्र नांवें.' असें म्हणून आस्तिक नागेशबरोबर गेलें.
शशांक तळमळत होता. आस्तिकांनी त्याचा हात हातांत घेतला. कढत कढत ! हात त्याच्या कपाळावरून त्यांनी प्रेमानें हात फिरविला. पोरगा भाजून निघत होता.
'बाळ, काय वाटतें ?' आस्तिकांनी मधुर शब्दांनी विचारिलें.
'तुमचा हात कपाळाला लागला कीं मला किती बरें वाटतें ! तुमचा हात-- आईचा हात, तुम्ही तर जगाची आई आहांत. आईच्या हाताहुनहि प्रेमळ हात. तुम्हीं कोठें गेलां होतात ? आतां तुम्ही बसा जवळ. नागेशला निजूं दे. तुम्ही काय करीत होतात, तात ? शशांकानें मधुर दृष्टीनें बघत विचारलें.
'आश्रमांत कीं नाहीं हारीत, दधीचि, यज्ञमूर्ति वगैरे महर्षि आले आहेत. त्यांच्याशी बोलत होतों. जनमेजयाचा द्वेषाग्नि कसा शांत करावा याचा विचार करीत होतों.' आस्तिक म्हणाले.
'माझ्या बाबांची बांसरी करीत शांत. गोड बांसरी, नाहीं का, तात ?" शशांकानें विचारलें.
'होय. तुझ्या वडिलांचे जीवन प्रेममय आहे. म्हणून ती बांसरी तशी वाजते. त्यांनी आपलें जीवनच मधुर केले आहे. ज्याच्या जीवनाची वेणू बेसूर नाहीं, त्याचीच बांसरी मधुर वाजते.' आस्तिक म्हणाले.
'तुम्ही का जाणार येथून ? तुम्ही मला टाकून नका जाऊं. त्या दिवशीं तुम्ही म्हणत होतांत, 'तुमच्याबरोबर होमकुंडांत मी पण उडी मारीन.' नागेश जवळ असला म्हणजे मी अथांग गंगेंत उडी मारतों. तुम्ही जवळ असलांत म्हणजे धडधडणा-या अग्निकुंडातहि मी हंसत उडी घेईन. मला न्या हां. न्याल नां !' त्यानें त्यांच्या मांडीवर डोकें ठेवून विचारिलें.
'कितीं कढत डोकें ! आधींच तुला आगींत घालून देव जणूं सर्वांहून शुध्द करीत आहे. शशांका, मी जाऊन येऊं का जरा ? ते बसले आहेत तिकडें.' आस्तिकांनी विचारिलें.