आस्तिक 56
"राजा आजारी पडला तर प्रजेचें कसें होणार ? राजानें फारच जपून वागलें पाहिजे.' एक मुलगा म्हणाला.
"राजाचें कोण ऐकतो ? प्रजेच्या स्वाधीन राजा.' परीक्षिति हंसून म्हणाला.
"नाहीं कांहीं. जनमेजय युवराजांनी नागांना आश्रमांत येऊं नका असें सांगतांच पुष्कळ आश्रमांतून त्यांना बंदी झाली. कांहीं आचार्यांनी असें पाप करण्यापेक्षां आश्रमच बंद केले. आमच्या येथें असें कांही आचार्य आले होते. त्यांना फार वाईट वाटत होते.' एक नागकुमार म्हणाला.
"परंतु येथील आश्रमांत तर उभय जातींचे छात्र आहेत. या आश्रमांत आल्यानें राजालाहि धन्यता वाटते.' परीक्षिति वस्त्रें परिधान करतां करतां बोलला.
सर्वांचीं स्नानें झालीं. भोजनें झालीं. भोजनोत्तर सर्वांनी विश्रांति घेतली. छात्र मात्र कामें करीत होते. आश्रमाच्या पटांगणांत त्यांनी आसनें मांडिली होतीं. तिसरें प्रहरीं कांही विचारविनिमय होता. झाडांच्या फांद्या वर पसरलेल्या होत्या. छाया होती. मधूनमधून फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या.
परीक्षिति उठला. इतर ऋषिहि उठले. आस्तिकांनी सर्वांना प्रेमळपणें विचारलें. सर्वांनी नेत्रांना जलस्पर्ष केला; चूळ भरली. सर्व मंडळी वृक्ष-मंडपात आली. छात्र सारे उभे होते. राजा परीक्षितीला आस्किांनी उच्चासनावर बसविलें. परीक्षितीनें त्यांनाहि जवळच दुस-या उच्चासनावर बसविलें. इतर ऋषिहि बसले. आश्रमांत येऊन राहिलेलेहि कांही ऋषि तेथें आले. मोठी प्रसन्न दिसत होती सभा.
भगवान् आस्तिक बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले :
"आज भाग्याचा दिवस आहे. आज थोर मंडळी आश्रमाला भेट देण्यासाठी आली आहे. आश्रमाचें कौतुक करण्यासाठी आली आहे. परीक्षिति महाराज आले आहेत. इतर ज्ञानधन व तपोधन महर्षीहि त्यांच्यासमवेत आले आहेत. आपण त्यांना काय देणार ? आपण त्यांना आदर व प्रेम देतों. आपल्याजवळ दुसरें काय आहे ? आश्रमांत राजा येणें म्हणजे सर्व प्रजा येणें. राजा म्हणजे प्रजा. राजा म्हणजे सर्व प्रजेचें कल्याण, सर्व प्रजेचें संरक्षण. राजा म्हणजे भेदातीत न्याय. राजा म्हणजे एक प्रकारें महान् संन्यासी. तो वैभवात असून अकिंचन असतो. त्याला स्वत:चें असें कांही नाहीं. वृक्षाची फुलें फळें दुस-यांसाठीं, वृक्षाचा विस्तार दुस-यासाठीं, तसें राजाचें आहे. म्हणून राजा हा विष्णूचा अंश आपण मानतों. विष्णु म्हणजे सर्वत्र प्रवेश करणारा.