आस्तिक 33
'आलों, आजी. अंधारात झाली फजिती हे भलतीकडेच गेले. मग आणले मी यांना शोधून. तूं वाट पाहात होतीस ना ?' वत्सलेनें आजीजवळ जाऊन विचारले.
'सोनें लुटायला गेली होतीस. म्हटलें जड झालें बहुधा तुम्हांला थोडें आणावें म्हणजे जड होत नाहीं. देवानें दिलें म्हणून अधाशाप्रमाणें फार नये घेऊं. नाहीं तर फाटायची झोळी व सारेंच धुळींत जायचें. फार नाहीं ना लुटलेंत सोनें ? आजीनें हंसून विचारलें.
'आजी, सानें दिसतें व नाहीसें होतें.' नागानंद म्हणाला.
'परंतु स्मृति अमर राहते.' आजी म्हणाली.
'आतां, आजी भूक लागल आहे. फार भूक. जन्मांत नव्हती लागली एवढी भूक. माझ्या अंगाला जणूं भूक लागली आहे. डोळयांत भरावा घांस, कानांत भरावा घांस, नाकांत भरावा घांस, तोंडांत भरावा घांस ! वणवा पेटला आहे, आजी, भूकेचा. येईपर्यंत कळलेंहि नाहीं. वाढ, लौकर वाढ. नाहीं तर खाईन तुला. खाईन यांना.' वत्सला वेडयाप्रमाणें बोलूं लागली.
'वेडें वेडें नको बोलू. चल घरांत. चला हो तुम्हीहि. ही अशीच आहे फटकळ. कधीं मुकी बसते तर कधी तोंडात सारीं पुराणें येऊन बसतात. वेडी आहे वत्सला. आश्रमांत राहूनहि वेडी.' सुश्रुता म्हणाली.
'आश्रमांत राहून वेडीच बनतात. जगाच्या आश्रमांत राहून शहाणपझज्ञ येते.' नागानंद म्हणाला.
'शहाणपणा देणारा एकच आश्रम आहे.' सुश्रुता म्हणाली.
'कोठें आहे तो ?' वत्सलेनें विचारिलें.
'काय त्याचें नांव ?' नागानंदानें विचारिलें.
'गृहस्थाश्रम.' सुश्रुता गंभीरपणें म्हणाली.