आस्तिक 68
पण तो स्वप्नांत येतो. स्वप्नांत तो डोळयांत येऊन बसतो, हृदयाशीं गुलगुल बोलतो. बाहूंत घुसतो, तें स्वप्नच चिरंजीव कां होत नाही ? दंवबिंदु सूर्याला पोटांत साठवतो, त्याप्रमाणें तें स्वप्न त्याच्या मूर्तीला सांठवतें. परंतु दंवबिंदु गळतो, तसें हें स्वप्नहि संपतें. तरंगित सरोवरांतील कमळ हिमवृष्टीनें नष्ट व्हावें तसें तरंगित निद्रेवर खेळणारें माझें गोड स्वप्न, सुगंधी स्वप्न, जागृतीची जरा हिमवृष्टि होतांच भंगतें. हे स्वप्न अमर करण्याची कोणी देईल का मला जादू ? मरणाजवळ असेल का ती जादू ? जीवनाजवळ तर नाही.'
असें तें गाणें होतें बांसरीतील सूर वाहत होते. वा-यावरून जात होते. सर्व सजीव-निर्जीव सृष्टीची समाधि लागली होती. समाधींत प्रेमज्योतींचे दर्शन घडत होतें. पांखरें तटस्थ होतीं. गाई स्वस्थ होत्या. नागानंद व वत्सला यांचे डोळे मिटलेले होते. एक नाग तेथें येऊन डोलत होता. बांसरी ऐकत होता. परंतु पांखरें घाबरली नाहींत, गाईवासरें हंबरली नाहींत. त्या वेळीं गाई गाई नव्हत्या. नाग नाग नव्हते, पांखरें पांखरें नव्हतीं. सर्व चैतन्याच्या एका महान् सिंधूंत समरस होऊन डोलत होतीं, डुंबत होतीं.
वत्सला भानावर नव्हती. जादूगर तिच्याकडे पाहत होता. मिटलेल्या नेत्रकमळांकडे पाहत होता. तिनें डोळे उघडलें. भावपूर्ण डोळे. ती तेथें पडलीं. तेथील गवतावर पडली.
'मला जरा पडूं दे. वर आकाशाकडे पडून बघूं दे. मी आतां माझी नाही. मी आकाशाची आहें, विश्वाची आहें. सृष्टींत भरून राहणा-या संगीताची आहें, प्रमाची आहे.' ती म्हणाली.
'वत्सला, तो बघ नाग, तो बघ साप.' तो एकदम म्हणाला.
'कुठें ?' ती एकदम उठून म्हणाली.'तो बघ जात आहे. बांसरी ऐकून जात आहे.' त्यानें सांगितलें.
असें साप येथें येतात ? तुम्हाला भीति नाहीं का वाटत ?' तिनें विचारलें.
'नाहीं वाटत असें नाहीं.' तो म्हणाला.
'मग घरीं राहायला चला ना.' ती म्हणाली.
'येथेंच बरें. येथें सापांच्या, वाघांच्या संगतींत भीति वाटली तरीहि मला आनंद होतो.' तो म्हणाला.
'माणसांपेक्षां का तीं अधिक ?' तिनें विचारिलें.
'माणसांची मला अद्याप भीति वाटते. माणसांचा विश्वास नाहीं वाटत.' तो म्हणाला.