आस्तिक 114
'आला का तुझा देव ? ' त्यानें विचारिलें.
'माझा देव; तुमचा नाहीं का ? ' तिने विचारिलें.
'आटोप लौकर पूजा.' तो म्हणाला.
तिनें परडीतील माळा मोकळया केल्या.
'तुम्ही या झाडाखालीं मुळाशीं बसा. या झाडाला मी प्रदक्षिणा घालतें.'ती म्हणाली.
तो झाडाच्या मुळांना टेंकून बसला. हातांत माळ घेऊन ती प्रदक्षिण घालीत होती. दमलेला कार्तिक झाडाला टेंकून डोळे मिटून बसला. त्याला का झोंप लागली होती ?
कृष्णी समोर उभी राहिली. हातांत माळ घेऊन उभी राहिली. कार्तिकाकडे ती पाहात होती.
'संपली का पूजा ? ' त्यानें डोळें उघडून विचारिलें.
तिनें हातांतील माळ त्याच्या गळयांत घातली. त्याच्या पायांवर तिनें डोकें ठेवलें.
'हें काय ? ' तो बावरून म्हणाला.
'ही माझी देवपूजा.' ती म्हणाली.
'रानांतील देव कोठें आहे ? ' त्यानें विचारिलें.
'या जगाच्या रानांतील तुम्ही माझे देव. माझें जीवन मी तुम्हांला दिलें आहे मी तुमच्या झोंपडींत राहीन. तुमच्यासाठी दळीन, तुमच्यासाठीं भाकर भाजीन. तुमचें सारें मी करीन. माझ्या पंचप्राणांनी तुमची पूजा करीन. भक्तला दूर लोटूं नका. चरणांशी ठेवा.' ती म्हणाली.
तो कांही बोलला नाहीं. स्तब्ध बसला होता.