आस्तिक 7
"विचार कर व काय तें ठरव. पृथ्वी विपुल आहे. कोठेंहि कष्ट करील त्याला पोट भरतां येईल.' सुश्रुता म्हणाली.
"आजी, केवळ पोट भरण्याचा प्रश्न नाहीं. आईबापांच्या प्रेमालाहि मुकण्याचा प्रश्न आहे. वत्सला आई नाहीं म्हणून रडते, आणि मी का असलेले बाईबाप सोडून जाऊं ?' त्यानें विचारले.
"मी तसें नाहीं सांगत. परंतु आईबापांपेक्षांहि ध्येय जर मोठें वाटूं लागलें, आईबापांच्या इच्छेपेक्षां आपल्या आत्म्याची हांक जर अधिक महत्त्वाची वाटूं लागली, तर मग त्यांचाहि त्याग विहित आहे. 'आत्म्याच्या भेटीसाठीं सर्व विश्वाचाहि त्याग करावा' असें ब्रह्मावेत्त्यांनी सांगितलें आहे.' सुश्रुता म्हणाली.
"वत्सला आश्रमांतून केव्हां येणार ? ती का शिकतच राहणार ? किती तरी दिवसांत ती भेटली नाहीं. कधीं आली होती इथें ? वसंतोत्सवांत सुध्दां नव्हती ना आली ?' कार्तिकानें उत्सुकतेनें विचारलें.
"ती म्हणते मी शिकेन व ब्रह्मवादिनी होईन. मला नको विवाह, मला नको संसार. मी विश्वाचा संसार करीन. लहान मुलांची आई होण्यापेक्षां ईश्वराची आई होण्याची मला इच्छा आहे. मी माझ्या जीवनांत ईश्वराला वाढवीन, ब्रह्माला वाढवीन. 'माझ्या जीवनांत अंतर्बाह्य परमेश्वर भरून राहील.' असें ती बोलते. काय आपण बोलतों तें तिचें तिला तरी समजतें की नाहीं कोणार ठाऊक मोठमोठी वाक्यें उच्चारते खरी. मीहि तिच्या इच्छेविरुध्द जात नाहीं. घरीं मी लग्नाची गोष्ट काढीन म्हणून ती येतच नाहीं अलीकडे.' सुश्रुता म्हणाली.
"वत्सला येणार म्हणून कोठें तरी ऐकलें. त्यासाठी राहणार होतों. भेटलों असतों तिला, पाहिली असती पुष्कळ दिवसांनी. येणार आहे का ती, आजी ?' त्यानें जिज्ञासेनें विचारिलें.
"ती प्रेम करते. तिचे वडील तर नागकन्येजवळ लग्न करणार होतें. ही गोष्ट कळल्यापासून तिच्या जीवनांत क्रांति झाली. 'आजी, मला लग्न नकोच मुळीं. परंतु कधीकाळीं केलें तर नागकुमाराजवळ मी लग्न करीन. परंतु तूं नाहीं ना विरोध करणार ? बाबानां तू नागकन्येजवळ लग्न लावू दिलें नाहिस. पण तुझ्या नातीला तरी तूं नागतरुणाजवळ लग्न लावूं देशील कीं नाहीं ? सांग ना आजी !' असें एक दिवस ती मला म्हणाली. मी सांगितलें, 'नाही हो विरोध करणार. नाग काय, आर्य काय, मानवच सारे. गुण असले म्हणजे झालें. मी पूर्वी वेडी होतें, अडाणी होतें. परंतु ज्या नागांसाठी तुझा पिता आगींत शिरला, त्या नागांचा आतां मी कसा द्वेष करूं? माझ्या मुलाने स्वत:च्या बलिदानानें मला ब्रह्मज्ञान दिले, वेदान्त शिकविला. त्याच्या जगण्यानें शिकले नाही तें त्याच्या मरणाने मी शिकलें. वत्सले, लग्न कर. अशी नको राहूं. कुलतंतू तुटू नये म्हणून तुझे आजोबा सदैव इच्छित. म्हणून त्यांनी मला सती जाऊं दिलें नाही. करशील ना तूं लग्न ?' ती हंसली. 'मी नाही करणार लग्न, मी ज्ञानाशी लग्न लावीन, ब्रह्माशी लावीन.' असे म्हणून प्रेमानें ती मला बिलगली; माझ्या मांडीवर डोके ठेवून निजली. गोड आहे वत्सला. किती सुंदर व प्रेमळ !