आस्तिक 79
आपल्यामध्यें 'नागांसाठींच हा देश' अशीहि चळवळ कांहींनी सुरू केली आहे. तिकडे वक्रतुंड वगैरे कांही आर्यहि 'हा आर्यावर्त आहे. तेथील मागासलेल्या नागांना व इतरांना आम्ही समुद्राच्या पार हांकून देऊं' असे म्हणत आहेत. आपण हें दोन्हीं आत्यंतिक मार्ग टाळावें, असें मला वाटतें. या एका निळया आकाशाखालीं आपणांस कां नांदता येऊं नये ? गंभीर नीलांग म्हणाला.
'परीक्षितीला मारून टाकण्याची मीं प्रतिज्ञा केली आहे.' एक नवयुवक म्हणाला.
'एकाला मारून काय होणार ? एकदां मारामारीच सुरू झाली म्हणजे मग कठिण. शक्य तों मारामारी टाळावी आणि हे वैयक्तिक वध टाळावें. समोरासमोर युध्दच जुंपले तर मग उपाय नाहीं.' असें अनंतानें सुचविलें.
'या आर्यांचा पूर्वींपासूनच हा सर्व देश बळकावयाचा बेत आहे. 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' असे ह्यांचे मंत्र. सर्व जग आर्यांचें करावयाचें, अशी ह्यांची महत्त्वाकांक्षा. आपणांस आस्ते आस्ते ते दूर तरी करतील किंवा आपले नागांचे वैशिष्टय मारून टाकतील. त्यांच्यातील सर्वांचेंच हें मत आहे असें नाहीं. कांही थोर असेंहि म्हणणारे आहेत कीं, 'आपण सर्व एकाच देवाचीं लेकरें एकमेकांचे चांगलें घेऊं व आनंदाने नांदूं.' नीलांगानें सांगितलें.
'कोणत्या देवाला आम्हीं भजावें ? पाऊस पाडणा-या देवाला, का वणवे लावणा-या देवाला ? पर्वत उभे करणा-या देवाला, का आकाशाचा चांदवा पसरणा-या देवाला ? वारे वाहवणा-या देवाला, का समुद्र उचंबळवणा-या देवाला ? असे प्रश्न या आर्यांतील कित्येकांनी केले आहेत. शेवटीं त्यांच्या एका महान ऋषीनें सांगितलें, 'एकाच त्या सत्तत्त्वाला निरनिराळया नांवांनीं आपण हांका मारितों.' नागदेव म्हणून म्हणा, इंद्रदेव म्हणून म्हणा. एकाच अनंत शक्तिमान् प्रभूला तीं नांवे पोंचतात. आर्यांपैकीं अनेकांचें हेंच मत आहे. परंतु कांहीं महत्त्वाकांक्षीं संकुचित व स्वार्थी आर्य आज निराळेंच धोरण आंखींत आहेत. आपण चळवळ अशी ठेवूं या कीं, ज्यामुळें खरे उदारचरित आर्यहि आपल्या बाजू येतील. तेहि आपल्या बाजूनें मग बोलतील. या संयुक्त आर्य व नागप्रचारानें वक्रतुंडाचें तोड जरा सरळ होईल.' वासुकि म्हणाला.
नागांची संघटना करायची, परंतु आर्यांच्या सहकाराची अपेक्षा ठेवून करावयाची असें ठरवून परिषद संपली. सारे गेले; परंतु परीक्षितीला मारण्याची प्रतिज्ञा करणारा तो नवयुवक तेथेंच राहिला. तो मनांत विचार करीत होता. शेवटीं त्यानें कांही तरी मनांत निश्चित केलें. त्यानें टाळी वाजविली; शीळ घातली. त्याला आनंद झाला.
त्या तरुणानें परीक्षितीच्या हस्तिनापूर राजधानींत प्रवेश केला. तो दिसे सुंदर. बोले गोङ मोठज्ञ लाघवी होता तो. त्यानें परीक्षितीकडे बल्लवाची सेवा स्वीकारली. तो उत्कृष्ट पक्वान्न करी. त्याच्या हातांत जणूं अमृतच होतें. परीक्षितीची त्याच्यावर मर्जी बसली. राजपत्नी त्याच्यावर प्रसन्न झाल्या.