आस्तिक 34
महर्षि आस्तिक महान् वटवृक्षाखालील शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षहि जणूं पुरातन तपोधनाप्रमाणें दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठें कोठें त्या जमिनींत शिरून त्याचे पुन्हा वृक्ष बनत होते. ते कार्तिक-मार्गशीर्ष महिन्याचे दिवस होते. वटवृक्षाच्या पानांपानांमधून लाल-लाल फळें शोभत होती. जणूं लाल रुद्राक्षच त्या वटवृक्षानें सर्वांगी धारण केले होते. सूर्य उगवला होता आश्रमांतील कुमारांनी झाडलोट करण्याचे आधींच सूर्यानें आपली सोन्याच्या हिरांची केरसुणी घेऊन सारा अंधार झाडून टाकला होता. द-याखो-यांतून, वृक्षराईतून सर्वत्र त्यानें तो सुवर्णझाडू फिरविला. औषधालाहि अंधाराचा केरकचरा ठेवला नाहीं. सूर्यानें अंधाराचा कचरा दूर केला. वा-यानें पुष्कळसा पानपातेरा पहाटे उठून देर केला. दंव पडून सडा घातला गेला होता. फुलांचा सुगंध पसरून पावित्र्य व प्रसन्नता निर्मिली होती. पक्ष्यांनी गोड किलबिल सुरू केली होती. आश्रमांतील सा-या बटूंनी सृष्टीच्या झाडलोटीत भाग घेतला. सर्व आरशासारखें स्वच्छ केले. स्नानें करून अंगाला ऊब यावी म्हणून भस्म फांसून ते मृगजिनावर येऊन बसले. समोर भगवान् आस्तिक होते.
'ॐ असतो मा सद्गमय
ॐ तमसो मा ज्योतिर्गमय
ॐ मृत्यो मा अमृतं गमय'
ही उपनिषदांतील प्रार्थना, लहानशी परंतु बहु अर्थमयी, त्यांनी डोळे मिटून म्हटली. नंतर आस्तिक बोलू लागले.
'मी थोडेसें सांगणार आहें आज. मग तुम्ही आपापलीं निरनिराळीं कामें करायला जा. मी जें सांगत असतों तें जीवनाला उद्देशून सांगत असतों. प्रत्येकाच्या जीवनाला उपयुक्त असें सांगत असतो. तुम्ही सारेच धनुर्वेत्ते नाहीं होणार. सारे संगीतवेत्ते नाही होणार. सारे राजनीतिज्ञ नाहीं होणार. परंतु मी जें सकाळी प्रार्थनेच्या वेळीं सांगत असतों तें, तुम्ही पुढें कांहींहि करा कीं कोठेंहि जा, तुम्हांला उपयोगी पडेल. बाळ अजित, एक उंबराचें फळ आण बघूं.'
अजित पटकन् उठला व एकदोन उंबरांची फळें घेऊन आला.
'फोड्, तूंच फोड एक.' आस्तिकांनी सांगितलें.
'फोडलें.' अजित म्हणाला.
'काय दिसतें तुला आंत ?' त्यांनी प्रश्न केला.
'आंत शेकडों बिया लवलव करीत आहेत. मोठी मौज दिसते. आणि हीं केंब्री बघा, भुरटी बघा आंत.' अजित म्हणाला.