आस्तिक 52
'कसली म्हणजे ?' ती हंसली.
'एकदां थंडीच्या दिवसांत सापाचीच मीं उशीं केली होती. मऊ थंडगार उशी ! ' तो म्हणाला.
'रानांत सापाची उशी, घरांत कापसाची उशी.' ती म्हणाली.
तिनें एक स्वच्छ उशी आणून दिली. तो झोंपला. तिनें त्याच्या अंगावर एक कांबळहि टाकली.
'कांबळ कशाला ? ' तो म्हणाला.
'म्हणजे नाग पळून जाणार नाहीं. गारठणार नाहीं. ऊब आहे, असें त्याला वाटेल.' ती म्हणाली.
वत्सला निजली. तिच्या डोक्या-केसांवरून मंगल हात फिरवून सुश्रुता आजीहि निजली. दूर कुत्रें भुंकत होते. मध्येंच वाघाची एक डरकाळीसुध्दां ऐकूं आली. वत्सला घाबरली. ओसलीला दार नव्हतें. ओसरी उघडी होती. 'वाघ तर नाहीं ना येणार ?' तिच्या मनांत आलें. ती उठून बाहेर आली. चंद्राचा प्रकाश नागानंदाच्या तोंडावर पडला होता. किती मधुर दिसत होतें तें तोंड ! चंद्र जणूं सहस्त्र करांनी त्या मुखाला कुरवाळीत होता. वत्सला अनिमिष नेत्रांनी पाहात राहिली. तिच्या मनांत कांही विचार आला. नागा-नंदाच्या चरणांशी ती गेली. ते पाय आपल्या मांडीवर घेऊन ती चुरीत बसली. नागानंद स्वस्थ झोंपेंत होता.
कांही वेळानें ती उठली. अंगणांत उभी राहिली. तिनें आपल्या हातांचें चुंबन घेतलें. नागानंदाचे पाय चेपून ते हात कृतार्थ झाले होते. तिनें ते हाल आपल्या मस्तकावरून फिरविले. जणूं नागानंदाच्या पायांची धूळ ती मस्तकी धरीत होती. ती धूळ म्हणजे तिची केशर-कस्तुरी, ती धूळ म्हणजे सारीं सुगंधी तेलें, ती धूळ म्हणते तिचा मोक्ष, तिचे सर्वस्व. तिला आज परब्रह्म मिळालें.
"वत्सले, अशी वा-यांत बाहेर काय उभी ? वेड तर नाहीं तुला लागलें ? चांदण्यांत वेड लागतें हो ! चल आंत.' सुश्रुता बाहेर येऊन म्हणाली.
"आजी, वाघाची डरकणी मीं ऐकली. म्हणून उठून आलें. हे बाहेर निजलेले. मनांत येऊं नयें तें आलें.' ती म्हणाली.
"थापा मार, तूं वाघ आला कीं काय हें का पाहायला आलीस ? सा-या मुलुखाची भित्री तूं.' आजी म्हणाली.