आस्तिक 22
'आजी, त्यांच्या भिंवया बघ कशा आहेत त्या ! अशा भिंवया भाग्याचें लक्षण मानतात ना ? 'वत्सलेने विचारिलें.
'जो आपले प्राण दुस-यांसाठी संकटात घालतो, त्याच्याहून कोण दुसरा अधिक भाग्यवान् ? खरोखर महात्माच तो.' आजी म्हणाली.
'यांच्या खांद्यावर कसला ग आहे हा डाग ? भाजलेलें असावें का ? का कांही लागलें असेल कधीं ? हा बघ चट्टा. खरा ना ?' वत्सला हळूच पाहात व दाखवीत म्हणाली.
'तुला त्यांनी पाण्यांतून वांचविलें, आणखी कोणाला आगींतून वांचविलें असेल. वीरांची भूषणें, वीरांची पदकें--' सुश्रुता म्हणाली.
तो तरुण जागा झाला. एकदम तो उठून बसला.
'बरें वाटतें ना ?' सुश्रुतेंनें विचारलें.
'हो.' तो म्हणाला.
'तुम्ही अकस्मात् कोठून आलांत ? जणूं देवानेंच पाठविलें ! कोणता तुमचा गांव, काय आपलें नांव ?' सुश्रुतेनें विचारलें.
'मला गांव असा नाहीं. जेथें जाईन तेथें माझा गांव. मी एकटा आहें. जगांत कोठें ओलावा आहे का ? हे पाहत फिरत असतों. सर्वत्र द्वेष व मत्सर भरून राहिला आहे. आर्य आणि नाग यांच्यांत प्रचंड कलहाग्नि पेटणार ! ठायीं ठायीं मी वास घेत आहें. आर्य तरुणांतहि द्वेषाची संघटना होत आहे; नागांतहि होत आहे. मला द्वेषाची हवा मानवत नाहीं. मी गुदमरतों. जेथें जाईन तेथें हा द्वेष नाकांत शिरतो. ह्या गांवाकडे वळली पावलें. नदीवर मी उभा होतों. घों आवाज येत होता. जणू मला देवाचें बोलावणें येत होतें. अनंत जीवन हांक मारीत होतें. इतक्यांत हांकाहांक ऐकली. फेंकली उडी. वाचलों तर दोघें वांचूं. नाही तर मीहि जाण्याला उत्सुकच होतो. धों आवाज मला हांक मारीतच होता.' तो तरुण म्हणाला.
'आस्तिक ऋषींच्या आश्रमांत तुम्ही कधी गेलां होतात का ? ते नवसंस्कृती निर्मीत आहेत. नाग व आर्य यांच्यात ऐक्य व्हावें म्हणून तो महात्मा पराकाष्ठा करीत आहे. त्यांना आपण साहाय्य करूं या. जेथें जेथें द्वेष फैलावला जात असेल, तेथें तेथें आपण स्नेह नेऊं या. कधी कधीं मला वाटतें कीं, प्रेमाची पताका खांद्यावर घ्यावी व नारदाप्रमाणें वीणा हाती घेऊन ऐक्याची गीतें गात निर्मल वा-याप्रमाणें विचरावें. स्नेहाचा ओलावा देत निर्मळ व स्वच्छ झ-याप्रमाणें सर्वत्र धावावें. नाचावें. परंतु माझे विचार मनांत राहतात. कोणी समानधर्मा भेटला, तर हे विचार प्रत्यक्ष मूर्त रूप धारण करतील. आश्रमांतील सदसतांच्या पलीकडच्या ब्रह्माचा मला वीट आला. कंटालें मी ब्रह्मज्ञानाला. प्रत्यक्ष अनुभूति घ्यावयास मी उत्सुक आहें, जशी अनुभूति आज तुम्हांला मिळाली ! दुस-याच्या जीवनांत मिळून जाण्याची अनुभूति !' वत्सला बोलून थांबली.