आस्तिक 65
दोघें कांहीं बोलत ना. शांत होतीं. भरलेलीं होतीं.
'वत्सले, ताजें दूध घेतेस ? गाईचे धारोष्ण दूध ?' त्यानें विचारिलें.
'मागें कार्तिकानें मधाचा घट आणला. तुम्ही दुधाचें भांडे द्या. या वत्सलेला नकोत हे रस. ह्यांची मला नाहीं तहानभूक. वत्सला निराळया रसाला आसावली आहे.' ती म्हणाली.
'हा बघ केळीच्या पानांचा द्रोण करून आणला आहे. घे दूध. नाहीं म्हणूं नको. ती गाय रागावेल. दुधाला नाहीं म्हणूं नये.' तो म्हणाला.
'तुम्हीहि माझ्याबरोबर घ्याल?' तिनें विचारिलें.
'हो, घेईन. नागाला दुधासारखें दुसरें कोणतेंच पेय प्रिय नाहीं. कधीं कधीं मला वाटतें, गाईच्या वत्सासारखें व्हावें व दूध प्यावें. दूध प्यावें व मस्त राहावें. त्या दिवशीं सुश्रुता आई मला म्हणाल्या, 'पीत जा भरपूर दूध, उरेल ते आणीत जा.' लहानपणीं आईचें दूध, मोठेपणीं गोमातेचें दूध ! नागदेवाला आम्ही दुधाचाच नैवेद्य दाखवतो.' तो म्हणाला.
'दूध पिऊन विष तयार करतात ना ?' वत्सला म्हणाली.
'परंतु खरा जातिवंत नाग त्या विषाचा क्वचितच उपयोग करतो. खरा नाग संन्यासी आहे, तपस्वी आहे. किती स्वच्छ, किती सोज्ज्वळ, किती निर्मळ ! त्याला इवलीहि घाण सहन होत नाहीं. शरीर जर अमंगळ असें वाटलें, तर तो तें काढून फेंकून देतो. त्या वेळी त्याला किती वेदना होतात ! परंतु नवीन सुंदर तेजस्वी शरीर मिळावहें म्हणून तो त्या अपार यातना सहन करतो. वेदनांशिवाय कांही एक सुंदर मिळत नाहीं. वेदनांतून सौदर्य, वेदनांतून माक्ष, वेदनांतून वेद ! वेदनांतून सारें बाहेर पडतें. बीजाला वेदना होता, त्याचें शरीर फाटतें व त्यांतून सुकुमार अंकुर बाहेर पडतो. मातेला वेदना होतात व सुंदर बाळ मांडीवर शोभतें. रात्रीला वेदना हातात व अनंत तारे दिसतात. उषा वेदनाग्नीनें लाल होते, भाजून निघते. तिच्या डोळयांतून पाणी घळघळतें. परंतु तेजस्वी बालसूर्य बाहेर पडतो. कवीला कळा लागतात व अपौरुषेय वेद बाहेर पडतात. एखाद्या रमणीला दु:ख होतें व डोळयांतून सुंदर मोतीं घळघळतात ! ज्यामुळें सारी सृष्टि कारूण्यमयी होते, त्या अश्रूंतून प्रेमाची कळी फुलते !शेतक-याला कष्ट होतात. घामानें तो भिजतो. परंतु पृथ्वी सश्यश्यामल सुंदर अशी दिसते ! वेदनांतून नवनिर्मिति होत असते.' नागानंद थांबला.