आस्तिक 2
पामरांचा पसारा झाला. भव्य भावनांचा स्पर्श ज्यांच्या जीवनांत होत नाही असे क्षुद्र जीव ह्या भारतांत आज दिसत आहेत. ज्याप्रमाणे अनंत आकाशांतील उंचावरची स्वच्छ व निर्मळ हवा क्षुद्र पांखरांना मानवत नाहीं, तीं पाखरें घाणीनें भरलेली, धुळीनें धूसर झालेली खालची मलिन हवाच पसंत करतात. त्याप्रमाणें ह्या भारतातील मानवांना नि:स्वार्थ व उच्च ध्येयवादाची हवा आज मानवेनाशी झाली आहे. ध्येयवादाची ते टर उडवीत आहेत. क्षुद्र भेदभावांत मौज मानीत आहेत. आर्य व नागजातीचे तरुण ठायीं ठायीं एकमेकांचा समूळ उच्छेद करण्यासाठी संघटित होत आहेत. त्यांच्या त्यांच्या जातींतील ऋषिहि आज द्वेषधर्माचे पुरस्कर्ते होत आहेत. इतरांना पंथदर्शन ज्यांनी करावें, ध्येयदर्शन ज्यांनी करावें, तेच स्खलितकति व ध्येयच्युत झाले आहेत. देवा, पुढें काय होणार ? हे द्वेषाचे वणवे एकदां पेटले म्हणजे काय होणार? आपली आशा नष्ट होणार, प्रयोग फसणार ! दोन मानव प्रवाह एकत्र नांदवतां न आले तर शेकडों प्रवाह पुढें कसे नांदवतां येतील ?
प्रभो, 'ह्या पवित्र प्रयोगाकडे लक्ष दे' म्हणून तूं मला सांगितलेंस. मी काळजीपूर्वक आरंभ केला आहे; परंतु मला धीर नाहीं निघत. मी तुला उठविलें. क्षमा कर, देवा, परंतु पुढें कसें करूं ते सांग.
प्रभो, ह्या पवित्र प्रयोगाकडे लक्ष दे' म्हणून तूं मला सांगितलेंस. मी काळजीपूर्वक आरंभ केला आहे; परंतु मला धीर नाहीं निघत. मी तुला उठविलें. क्षमा कर, देवा, परंतु पुढें कसें करूं तें सांग.
प्रयोगपतींचे म्हणणे प्रभु शांतपणें ऐकून घेत होता. त्यानें त्याला पोटाशी धरलें. प्रसन्न दृष्टीनें त्याच्याकडे पाहिलें. त्याच्या पाठीवरून व डोक्यावरून मंगल हात फिरवला. प्रभूचा स्पर्श होतांच प्रयोगपतीचें नैराश्य जणू निरस्त झालें. सूर्य येतांच धुकें जातें, पाऊस पडतांच रखरखीतपणा जातो.
प्रभु म्हणाला, 'वत्सा, भिऊं नको. तूं प्रयोग सुरू ठेव. ज्या वेळी प्रयोग फसणार असें वाटतें, त्याच वेळी तो सफल होणार असें समजावें. अत्यंत उन्हाळा होऊं लागतांच पावसाळा जवळ आला असें समजावें. अत्यंत हिवाळा होऊं लागला कीं, उन्हाळा जवळ आहे असें समजावें. अमावास्येचा काळाकुट्ट अंधार भरला, म्हणजे बीजेची चंद्रकोर लवकरच दिसणार असें समजावें. अत्यंत वेदना होऊ लागल्या, की मातेला नवीन सुंदर बाळ मिळणार असे समजावें. अत्यंत विरोधाच्या पोटांतून विकास बाहेर पडत असतो.'
"खरेंच, देवदेवा, लहान मुलाला नवीन चिमणे दांत येत असतात त्या वेळी त्याला ताप येतो, त्याला वांत्या होतात. अननुभवी माता घाबरते, परंतु घरांतील अनुभवी वृध्द आजीबाई सांगतो, 'घाबरूं नकोस, सूनबाई, त्याला दात येत आहेत.' मुलाचा विकास व्हायचा असतो. त्या विकासाच्या आधी त्या वेदना होतात. काळेकभिन्न मेघ आले कीं, त्यांतूनच स्वच्छ अशा रजतधारा जगाला मिळणार यांत संशय नाहीं. त्या काळेपणांतून जगाला जीवन मिळतें.' प्रयोगपति म्हणाला.