आस्तिक 16
"पुढील जन्म ? कोणी पाहिला आहे पुढील जन्म ? कोणीहि मेलेला परत आला नाही. त्यानें येऊन सांगितलें नाहीं.' वत्सला म्हणाली.
"दूर बागेंत फुलें फुलली आहेत कीं नाहींत हें न पाहतां वास आला म्हणजे आपण म्हणतों की फुलें फुलली आहेत. त्याप्रमाणें कांही गोष्टींना जीवनांत वास सुटतो, त्यावरून फुलें फुलली होती असें कळतें. नाहीं तर जीवनांत हा सुगंध कां भरावा वत्सले, या जन्मांत एखाद्याला आपण एकदम पाहतों व त्याच्याबद्दल आपणांस एकदम निराळें वाटतें. असें कां वाटावें ? यांत कांहीच अर्थ नाहीं का ? तो सुगंध आपण घेऊं देत असतों. या स्मृति आपण घेऊन येत असतों. त्या त्या व्यक्ति भेटतांच ते ते जीवनांतील सुगंधकोश फुटतात व जीवन दरवळून जातें.' कार्तिक म्हणाला.
"तुम्हांला पाहून माझे जीवन दरवळत नाहीं. माझें जीवनवन दरवळून टाकणारा वसंत अद्याप यायचा आहे. माझ्या जीवनांत अद्याप शिशिरच आहे. सारें उजाड आहे. ना फुलें, ना फळें, ना कमळें, ना भृंग, ना मंजिरी, ना पी, कांही नाहीं, कार्तिक, तूं जा. मला सतावूं नकोस.' वत्सला म्हणाली.
"माझ्यामुळें तुला त्रास तरी होतो. माझ्या अस्तित्वाचा अगदींच परिणाम होत नाहीं असें नाही. आज त्रास होतों. उद्यां वास येईल. मला आशा आहे. जातों मीं.' असें म्हणून कार्तिक गेला.
वत्सला पुन्हां अंथरुणावर पडली. पुन्हां उठून बसली. आळेपिळे तिनें दिले. ती आज आळसावली होती, सुस्त झाली होती. कोठें गेलें तिचे चापल्य, कोठें गेला अल्लडपणा ? कसला झाला आहे तिला भार ? कशाच्या ओझ्याखाली दडपली गेली तिची स्फूर्ति ? हंसली; मंदमधुर अशी ती हंसली. पुन्हां तिनें डोळें मिटले. तो गंभीर झाली.
थोडया वेळाने ती नदीवर गेली. किती तरी तेथें गर्दी होती ! सुश्रुता एका बाजूला धूत होती. वत्सला जाऊन उभी राहिली.
"आलीस वाटतं. बरं नसेल वाटत तर नको करूं स्नान.' आजी म्हणाली.
"नदी म्हणजे माता. या मातेचे सहस्त्र तरंग अंगाला लागून उदासीनपणा जाईल. ही माता हजारों हातांनी मला न्हाऊं-माखूं घालील. माझें मालिन्य दवडील. टाकू मी उडी ?' तिनें विचारलें.
"उडी नको मारूं. तुला नीट तरंगायला येत नाहीं. येथें पाण्यांत उभी राहा व अंग धू. फार वेळ पाण्यांत राहूं नको.' सुश्रुता म्हणाली.