आस्तिक 9
राजा परीक्षिति चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्यानें स्वत: तयार करविली होती. वेंचक प्रसंगांची चित्रे त्यानें नामांकित चित्रकारांकडून तेथें काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्यें समोरासमोर उभी आहेत. अर्जुनानें 'रथ हांकल' म्हणून श्रीकृष्णाला सांगितले. रथ हांकलल्यावर अर्जुन रथांत उभा राहून सर्वत्र जों पाहूं लागला तों त्याला महान् कुलक्षय दिसूं लागला. 'युध्द नको' तो म्हणू लागला. हातांतील गांडीव गळून पडलें. अशा प्रसंगाचे एक सुंदर चित्र तेथें होते. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना तहान लागते, तेव्हा अर्जुन बाण मारून पाताळांतील गंगा वर आणतो व तिची धार त्यांच्या मुखांत सोडतो, तो प्रसंग तेथें चितारलेला होता. श्रीकृष्ण भगवान् गोकुळांत गाई चारीत असल्याचा मनोहर प्रसंग तेथें होता. शिष्टाई करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा आले होते त्या वेळचेहिं एक चित्र होतें. ऊर्वशी अर्जुनाला स्वर्गात मोह पाडते त्या प्रसंगाचे एक चित्र होते. विराटाच्या दरबारांत धर्मराजाला राजा विराट फांसा मारतो व धर्मराज ते रक्त खालीं पडूं न देता अंजलीत धरतो, तो एक प्रसंग तेथे होता. वी अभिमन्यु एकटा कर्ण-द्रोणांजवळ लढत आहे असें एक सुंदर चित्र तेथें होतें. अर्जुनाने खांडववन जाळून अग्नि नांवाच्या ऋषीला अर्पण केलें, व तो ऋषि अर्जुनाला 'विजयरथ' प्रसन्न होऊन देत आहे, तो प्रसंग फारच अप्रतिम रंगविला होता. तो चित्रशाळा म्हणजे चित्रमय इतिहास होता. त्या चित्रांच्या दर्शनानें नाना भावना मनांत उत्पन्न होत. कधी करुण भावना उचंबळून डोळे ओले होत, तर कधी अंगावर काटा उभा राही. कधी वीररस मनांत संचरे, तर कधीं गंभीर भाव हृदयांत भरे. त्या महान् विभूति डोळयांसमोर उभ्या राहात. सत्त्वशील धर्मराजा पराक्रमी असूनहि कृष्ण शिष्टाईला निघतो तेव्हा त्याला 'देवा, शक्य तों युध्द टाळ' असें सांगणारा दिलदार भीम, वीरशिरोमणी सुभद्रापति अर्जुन, ते प्रेमळ व अत्यंत सुंदर नकुल-सहदेव, ती कारुण्यमूर्ति परंतु तेजस्विनी द्रौपदी, तो मर अभिमन्यु, ती पतिव्रता गांधारी - जिनें पति अंध म्हणून स्वत:च्याहि दृष्टिसुखाचा त्याग केला, तो स्वाभिमानी दुर्योधन, भीमाच्या गदेनें मांडी मोडून पडली असतांहि 'माझे काय वाईट झालें ? क्षत्रियाला मरण आहेच. मी साम्राज्य भोगलें. भीमासारख्यांच्या हाती पोळपाट दिला, अर्जुनाला बृहन्नडा बनविले. आणखी काय मला पाहिजे ?' असे त्याचे उद्गार ! तो धीरवीर कर्ण, उदारांचा राणा ! ते धृतव्रत इच्छामरणी महान. भीष्म ! ते कृतान्ताप्रमाणे लढणारे परंतु पुत्र मेला असें कळतांच मरणाला मिठी मारणारे प्रेमळ द्रोण ! नकुल-सहदेवांचे सख्खे मामा असूनहि आधी दुर्योधन आला म्हणून त्याच्या मदतीला जाणारे शल्य, आणि ते कर्मयांगी भगवान् श्रीकृष्ण, त्यांचा तो सखा विदुर व पांडव वनांत असतां विदुराकडे दारिद्रयात राहणारी ती स्वाभिमानी कुंती ! प्रणाम ! त्या महान् स्त्री-पुरुषांना प्रणाम ! केवढी वैभवशाली पिढी ! परंतु ती सारी कुरुक्षेत्रावर कापली गेली. कारण काय, तर भाऊबंदकी ! भारतवर्षांतील लाखों क्षत्रिय तेथें या ना त्या बाजूला लढून धारातीर्थी पडले. लाखों स्त्रिया पतिहीन झाल्या. लाखों अर्भकें पितृहीन झाली.
परीक्षितीनें तें महाभारत तेथे रंगांत उतरवून घेतलें होतें. अश्रूंचे व रक्ताचें महाभारत तेथें नाना रंगांत लिहिलेलें होतें. मुके रंग, मुक्या आकृति, मुके प्रसंग ! परंतु त्या मुकेपणांत सहस्त्र जिव्हा होत्या. परीक्षितीला कंटाळा आला, कधी विमनस्कता वाटली म्हणजे तो चित्रशाळेंत येई. तेथें तो रमे. क्षणभर वर्तमानकाळ विसरून भुतकाळांत बुडून जाई.