आस्तिक 20
'तिला कुंभाराच्या चाकावर घालूं, चला.' तो म्हणाला.
कार्तिक वत्सलेला घेऊन कुंभाराकडे गेला. बरोबर सुश्रुता होती. इतर मंडळी होती. स्त्री-पुरुषांची गर्दी होती. कुंभाराचें चाक गरगर फिरलें. पोटांतून भडभड पाणी बाहेर पडलें. वत्सलेच्या जिवांत धुगधुगी आली. छाती खालीवर होऊ लागली. तिनें डोळे उघडलें. श्रान्त निस्तेज डोळे !
वत्सलेला घरी नेण्यांत आले. तिला ऊबदार वस्त्रांत पांघरवून ठेवण्यांत आलें. कढत पाणी तिला देण्यांत आलें. सुश्रुता तिच्याजवळ बसली होती. परंतु तो प्राणदाता तरुण कोठे आहे ? तो काळासांवळा त्यागी तरुण कोठें आहे ? त्याला का सारे विसरले ? गरज सरो, वैद्य मरो, हीच का जगाची रीत ? कामपुरतेच का सारे मामा ?
'कार्तिक, तो तरुण कोठें आहें ? कोण तो, कोठला आहे तो ? त्याला जा आण. त्याने उडी घेतली. आपले प्राण त्यानें संकटात घातले. जा, कार्तिक जा, ' सुश्रुता म्हणाली.
कार्तिक गेला. नदीवर गेला. नदीवर आतां कोणी नव्हतें. फक्त ती नदीच भरून वाहत होती. इतक्यात त्याला दूर कोणी तरी दिसलें. कोण होते तें ? नदीतीरावरील दरडीवर तो तरुण उभा होता. नदीच्या लाल पाण्याकडे बघत होता. ज्या नदीजवळ तो झगडून आला, तिच्याकडे तो बघत होता. कार्तिक तेथें धांवतच गेला.
'काय करतां येथें ? तुम्ही दमला आहात.' तो म्हणाला.
"होय, दमलों आहे. मला विश्रांती पाहिजे आहे. विश्रांती घेण्यासाठीं जाऊं म्हणतो.' तो तरुण म्हणाला.
'चला, विश्रांती घ्यायला. सुश्रुता आजीने बोलावलें आहे. ज्या मुलीला वांचवलेत तिच्या आजीनें. ती मुलगी वांचली. ती आतां लौकरच नीट बरी होईल. अंथरुणांत गुरगटवून ठेवलें आहे तिला. चला, तेथें विसांवा घ्या.' कार्तिक म्हणाला.
'तो क्षणभर विसांवा. तो कितीसा पुरणार ? मला कायमचा विसांवा पाहिजे आहे. ही नदी देईल मला विसांवा. तिची एक वस्तु मी हिरावून आणली; तिला दुसरी वस्तु बदली देतों. मौल्यवान् वस्तु आणली; क्षुद्र वस्तु देतों.' तो तरुण म्हणाला.
'तुमचे जीवन काय क्षुद्र ? ' कार्तिकानें विचारलें.'
'ज्या जीवनाची जगांत कोणाला आवश्यकता नाही, ते क्षुद्र जीवन. माझ्या जीवनाची कोणाला आहे जरुरी ? मला आई ना बाप, भाऊ ना बहीण, सखा ना मित्र. मी कशासाठी जगूं ?' त्या तरुणाने विचारले.