आस्तिक 151
'आजचा परम मंगल दिवस. उपनिषदें आज कृतार्थ झालीं. परमेश्वरानें फार मोठी कृपा करून हा दिवस दाखविला. या भारताच्या इतिहासाचें विधिलिखित आज आपण लिहून ठेवीत आहोंत, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवीत आहोत. निरनिराळया जातींनी सूडबुध्दीनें एकमेकांशी सदैव लढत राहण्याऐवजी, 'आपलीच संस्कृति श्रेष्ठ, आपणच काय ते देवाचे लाडके, सर्व सद्गुण केवळ आपणंतच आहेत, बाकीचे मानववंश महणजे नुसते शुंभ, हीन, असंस्कृत पशु' असे मानण्याऐवजीं दुस-या मानव वंशास गुलाम करून त्यांचा उच्छेद करण्याऐवजीं सर्व मानववंशात दिव्यता आहे, त्या त्या भिन्न मानवी समाजांतहि एक प्रकारची चारित्र्याची प्रभा असते, त्यांच्या त्यांच्या संस्कृतींतहिविशिष्ट असे महत्वाचे गुण असतात. हे ध्यानांत घेऊन एकमेकांनी एकमेकांच्या जवळ येणें, मनानें व बुध्दीनें अधिक श्रीमंत होणें, अधिक विशाल होणें हें सर्व मानवांचे कर्तव्य आहे, ही गोष्ट या भारतांत आज प्रामुख्यानें ओळखिली जात आहे. अत:पर झाले गेलें विसरून गेलें पहिजे. खंडीभर मातींतून जो एक सोन्याचा कण मिळतो तो आपण जवळ घेतों. त्याप्रमाणे मानवीं इतिहासाच्या अनंत घडामोडींतून शेवटीं जो सत्कण मिळतो, तो घेऊन पुढें गेले पाहिजे. ती आपली पुढची शिदोरी. भावी पिढीच्या हातांत द्वेषाची जुनी मशाल आपण देणार नाहीं. प्रेमाचा हा दीप त्यांच्या हातीं देऊं. 'हा नंदादीप वाढवीत न्या,' असे त्यांना सांगूं. जो सोन्याचा कण आपणांस मिळाला तो त्यंना देऊं. जुनीं मढीं उकरीत बसण्यांत अर्थ नाहीं. जुन्या इतिहासांतील भांडणें उगाळींत बसण्यांत अर्थ नाहीं.जुन्या इतिहासांतील मंगल घेऊन पुढें गेले पाहिजे. एका म्हाता-याची गोष्ट तुम्हांला माहीत असेल. त्याला दोन मुलगे होते. दोघांतील शहाणा कोण, तें त्याला पाहावयाचें होतें. त्यों त्यांना दोन खोल्या बांधून दिल्या. किंचित् द्रव्य दिलें. 'एवढयाश्या द्रव्यांत जो आपली खोली भरून दाखवील तयाला मी माझी सर्व संपत्ति देईन.' असें त्यानें सांगितलें. एका मुलाला गांवातील कचराच अगदी अल्प किंमतीत मिळाला. त्याने गाडया भरून ती घाण आणली व खोली भरून टाकिली. परंतु तो दुसरा मुलगा. त्यानें मातीच्या दहा पणत्या विकत घेतल्या. त्यांत तेल घातलें, वाती घातल्या. ते लहानसे मंगल दीप त्यानें खोलीत लावून ठेवले. बाप परीक्षा घ्यावयास आला. एक खोली त्याने घाणींने भरलेली पाहिली. एका खोलीत मधुर मंगल असा शांत प्रकाश भरलेला पाहिला. आपणहि जुन्या इतिहासांतील घाण नेहमीं बरोबर बाळगूं नये. त्यांतील प्रकाश घ्यावा. आतां उखाळयापाखाळया नका काढूं. सर्व राजे-महाराजे, सर्व ऋषिमुनि, सर्व आश्रम, सर्व प्रजा, सर्वांनी आता हे ऐक्याचे बाळ वाढवावे.
ये, तक्षकवंशांतील नायका, ये. तुझा व जनमेजयाचा हात मी एकमेकांच्या हातांत देतो. या. आतां हे हात एकमेकांस तारोत, सांभाळोत. हे हात प्रेमसेवा देवोत. हे हातं विषे चारणार नाहींत. होळींत लोटणार नाहींत. भेटा, परस्परांस क्षेमालिंगन द्या. इंद्रा तूंहि ये. जनमेजयास भेट. मणिपूरच्या राजा, ये, तूंहि जनमेजयास हृदयाशी धर. भरतखंडांत आतां शांति नांदो, आनंद नांदो, विवेक नांदो, स्नेह नांदो, सहकार्य नांदो. आज मला धन्य धन्य वाटत आहे. तपोधनाला शांतिप्रसारापेक्षां दुस-या कशांत आनंद आहे ? खरा धर्मशील मनुष्य उगीचच्या उगीच केवळ स्वार्थासाठीं जगाला युध्दाच्या खाईत लोटणार नाहीं. खरा धर्मशील मनुष्य हे वणवे विझवण्याचा कसून प्रयत्न करील, स्वत:चे प्राण अर्पून प्रयत्न करील. आज तुम्ही सारें खरे धर्मपूजक शोभतां. आज धर्माला आनंद झाला असेल, परमेश्वराला प्रेमाचें भरतें आलें असेल ! '