आस्तिक 113
'आग होत असेल म्हणून तोंडांत घातलें. तुम्हाला मी रोज भाकरी भाजून आणीन. मी तुमचें रोज दळीन.' ती म्हणाली.
'चल, उशीर होईल. देवाचें दर्शंन घेऊन येऊं. रानांतील देव. किर्र झाडांतील नागांचा देव.' तो म्हणाला.
दोघें निघाली. गांवाबाहेर दाट जंगल होतें तिकडे निघालीं. किती तरी पक्षी किलबिल करीत होते. किती गोड आवाज ! एका पक्ष्याचा आवाज फारच मधुर होता.
'तो नर आहे. तो मादीला हांक मारीत आहे. या नराची मादी जवळच असते. परंतु छपून राहते. ओरडून ओरडून तो दमला म्हणजे ती हळूच येते व त्याला प्रेमानें चोंच मारते.' कृष्णी म्हणाली.
'किती लांब आहे देव ? शेतावर परतायला उशीर होईल. तुला घरीं जायला रात्र होईल.' तो म्हणाला.
'रात्र तर माझी मैत्रिण दिवसच माझा शत्रु.' ती म्हणाली.
'साप रात्रीं बाहेर पडतात. सर्पपूजक का तसेच आहेत ? ' तो हंसून म्हणाला.
'माझा देव म्हटलें तर लांब हो, म्हटलें तर जवळ आहे.' ती म्हणाली.
'म्हणजे काय ? ' तो म्हणाला.
'थांब, तो पाहा साप. जाऊं दे त्याला. देवाच्या जवळ आलों आपण.' ती म्हणाली.
त्यानें भिऊन तिचा हात धरला.
'कृष्णे, परत जाऊं.' तो म्हणाला.
'भिऊं नका. मी आहें बरोबर. देवाला भेटल्याशिवाय जाऊं नये.' ती म्हणाली.
एका प्रचंड वृक्षाखालीं तीं दोघे थांबली.