आस्तिक 6
ती वाळलेली फुलें, किती वर्ष झाली त्या गोष्टीला ? चाळीस वर्षें होऊन गेली; परंतु चंदनाच्या करंडयात तीं वाळलेली फुलें मीं ठेवली आहेत. ज्या ज्या वेळीं मला अपार शोक होतो, दु:खाच्या आठवणी येतात, हृदय जळूं लागतें, त्या त्या वेळी तो अमोल करंडक मी हृदयाशी धरतें. शोकसागर तरून जाण्याचा तो माझा भोपळा आहे. तो करंडक म्हणजे माझा सेतु, माझा आधार, माझा विसावा हा पाहा मीं पदरांत धरला आहे ह्या वेळेला. तूं येण्याच्या आधीं स्मृतिसागर हेलावून आला होता. ह्या करंडकाच्या ह्या नावेचा आधार घेतला. ही बघ, ही चंदनाची डबी. ही सुंदर करंडिका रत्नाकराला त्याच्या एका नागमित्रानें दिली होती. रत्नाकरास नागांबद्दल प्रेम वाटे. कसे काळेसावळें दिसतात, जणूं गगनाची बाळें, समुद्राची मुलें, असे म्हणायचा. त्याचें हृदय तो जिवंत असतांना मला कळलें नाहीं. आज अधिक यथार्थपणे मी त्याला जाणूं शकतें. रत्नाकर काळाच्या पुढें होता. त्याच्या काळांत त्याचे विचार कोणाला फार रुचत नसत, समजत नसत. तो मेल्यावर त्याची ही डबी, नागमित्रानें दिलेली ही प्रेमाची भेट. तिच्यांत माझी पतीची भेटहि मीं ठेवली. ही चंदनाची लहानशी डबी ! परंतु ह्या डबींत अंतर्बाह्य माझ्या पुत्राचें व पतीचें जीवन भरून राहिलें आहे आणि आर्य व नागजातीचें प्रेमहि त्यांत मिसळलेलें आहे. माझा सारा ठेवा ह्यांत आहे.' असें म्हणून सुश्रुतेनें तो चंदनी करंडक मस्तकीं धरला. तिनें डोळे मिटले. जणूं भारताच्या ध्येयाची ती पूजा करीत होती. भारताचें ईश्वरनिर्मित कर्म डोक्यावर धरून पवित्र होत होती.
कार्तिक सारें ऐकत होता, बघत होता. ती पवित्र समाधि त्याच्यानें भंगवेना. हळूहळू तिनें डोळे उघडले. तो करंडक हातांत होता.
"वास येतो आहे चंदनाचा.' कार्तिक म्हणाला.
"तो चंदनाचा आहे का नागबंधूंच्या प्रेमाचा आहे ?' तिने विचारलें.
"सुश्रुताआजी, वत्सलेचे वडीज आज असते तर त्यांनी कोणाची बाजू घेतली असती ? नाग व आर्य यांचीं सारखीं भांडणें होत आहेत. काय करावें कळत नाही. मी ज्या आश्रमांत राहतों, तेथें नागांचा द्वेष शिकविला जातो. मला तेथें राहण्याची इच्छा होत नाहीं. परंतु बाबांचा हट्ट. घरीं येथें आलों आहें, तर लहान भाऊं सारखे नागांच्या विरुध्द बोलत असतात. कारण बाबा तेंच त्यांना शिकवतात. नाग का वाईट आहेत ? जरा दिसतात काळे म्हणून का वाईट झाले ते ? त्यांच्यातहि शूर, त्यागी व प्रेमळ लोक आहेत. मग हीं कां भांडणें ? आज नदीवर मारामारी झाली. आर्य तरुण पोहत होते, तेथे एक नाग तरुण आला. तेथें पाणी होतें. उडया मारण्याची तेथें गंमत होती. परंतु आर्य कुमारांनी त्याला हाकललें. मग तिकडून नागकुमारांची टोळी आली. चांगलीच जुंपली. मी दोघांना शांत राहा असें सांगितलें. 'नदी तर दोघांनाहि या म्हणत आहे; ती कोणालाच ना म्हणत नाही. तिला काय वाटेल तुमचीं भांडणें पाहून ? ती रडेल.' असें मी म्हटलें. परंतु इतक्यांत पाऊस येईल असें वाटलें. टपटप पाणी पडूं लागलें. त्यामुळे मारामारी थांबली. आकाशाच्या अश्रूंनी थांबवलें भांडण ! 'मी तुम्हां सर्वांना माझ्या पांघरुणाखाली घेत असतों. मग तुम्ही कां एकमेकांना जवळ घेत नाहीं ?' असें का तें आकाश मुके अश्रू ढाळून त्या मुलांना शिकवीत होतें ? सुश्रुता आजी, गोष्टी वाईट थराला जाऊं लागल्या आहेत. मी माझा आश्रम सोडून देऊं का ? परंतु बाबा रागावतील ! आश्रम सोडायचा तर घरहि सोडलें पाहिजे.' कार्तिक म्हणाला.